पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आप्पा, मी तुम्हाला जयंतासारखा ना? माझ्यापासून काही लपवायचं नाही. सांग बघू काय काय होतय ते?"

आणखी कोणी असता तर आप्पांनी उडवाउडवी केली असती. पण अतुल, त्यांच्या मित्राचा मुलगा. त्यांचा लाडका, बुद्धिवान विद्यार्थी. त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणारा. एरवीसुद्धा त्यांच्याशी प्रतारणा करणं जमणार नाही; आणि एक डॉक्टर म्हणून अशक्यच.

 आप्पांनी त्याला सर्व काही सांगितलं. थकवा, गरगरणं, पाठदुखी, कधी कधी एकदम अंधुक दिसणं वगैरे वगैरे.

 "आप्पा" तो गलबलून म्हणाला, "खरं तर तुम्ही आधीच मला सगळं सांगायला यायला हवं होतं."तो क्षणभर थांबला. आप्पा मनात म्हणाले. मी यायचं. तू फी पण घ्यायचा नाहीस. अतुल एकदम म्हणाला,

 "आप्पा, नाही तरी तीन-चार दिवस जयंता येणार नाही. मी तुम्हाला माझ्या मित्राच्या क्लिनिकमध्ये ठेवतो. आपण सगळ्या तपासण्या करुन घेऊ."

 "तुला कसली शंका येतेय? काही सिरीयस आहे का?"

 "तसं नाही आप्पा. पण चेक-अप केलेला बरा. वाटल्यास जयंता आल्यावर करु."

 “नको, नको" आप्पा घाईघाईत म्हणाले, "तू म्हणतोस, तसंच करु.” आप्पांना जयंता-सुलुची धावपळ व्हायला नको होती.

 "ठीक आहे. मी सखारामला पाठवून देतो."

 आप्पा 'संजीवनी' क्लिनिकमध्ये दाखल झाले. टेस्टस् सुरु झाल्या. रक्त, लघवी, थुंकी तपासायला दिली. एक्स-रे. ई.सी.जी. झाले. बेरियम टेस्ट, पल्स् चेकिंग झालं. तिसऱ्या दिवशी सगळे रिपोर्टस् मिळायचे होते. जेवण चहा वगैरे सर्व व्यवस्था अतुलनेच केली होती. त्यामुळे बिल्डिंगमध्ये काही गाजावाजा झाला नाही. फक्त शेजारच्या राघुअण्णांना माहीत होतं. पण कुणाकडेहि, अगदी जयंताजवळसुद्धा, याविषयी अवाक्षर न काढण्याबद्दल आप्पांनी त्याला बजावलं होतं. तो सांगितल्याप्रमाणे ऐकेल याची आप्पांना खात्री होती.

 ‘संजीवनी’चे डॉ. दीक्षित आप्पांना रिपोर्टस्चा रिझल्ट सांगेनात आणि फी पण सांगेनात. मग आप्पा त्याच्या रुममध्ये त्याच्याशी सफाईदार इंग्रजीत बोलू लागले.

थँक यू मि. डेथ / ७८