पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या आजाराची आपणच चर्चा करु लागले. संभाषणातून व्यक्त होणाऱ्या आप्पांच्या व्यक्तिमत्वाने, चिंतनशील स्वभावाने आणि कणखर वृत्तीने डॉक्टर भारून गेले. काही सांगितले तरी हा पेशंट घाबरुन जाणार नाही ह्याची खात्री झाल्यावर त्याने आप्पांना विश्वासात घेत त्यांच्या हृदयविकाराविषयी सविस्तर सांगितले. बाय पास सर्जरीने आप्पा पूर्ववत् होणार होते. अशा बाय पास आजकाल अगदी सोप्या झाल्या होत्या. अगदी एखाद्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनसारख्या.

 खर्च फक्त दीड लाख रुपयांचा होता!

 संपूर्ण चर्चेत आप्पांना एवढी एकच अवघड गोष्ट वाटली. के.ई.एम्. मध्ये खर्च कमी येणार होता. तिथे जाण्यासाठी एक चिट्टी आणि शुभेच्छा देऊन डॉ दीक्षितांनी निरोप घेतला.

 आप्पा उठले. बरं झालं. अतुल कॉन्फरन्ससाठी आठ दिवस दिल्लीला गेलाय ते. एरवी या दीक्षितांनी काही सांगितलं नसतं.

 जयंता, सुलू आले. आप्पांनी घर लख्ख करुन ठेवलं होते. सुलू मात्र आप्पांना बघून म्हणाली, “आप्पा काही होतंय का तुम्हाला? अगदी थकलेले दिसताय.”

 "छे ग, चार दिवसात तुझ्या हातचं जेवलो नाही ना? बसा तुम्ही. मी फक्कड चहा बनवतो. जयंता - शेखरची लाडकी मस्का खारी बिस्किटं आणलीत बघ. मग सगळं सांग वारणानगरच्या अॅडमिशनचं.

 "आप्पा, शेखरला पाहिजे त्या कोर्सला अॅडमिशन मिळेल, पण-'"

 "पण काय?"

 “पन्नास हजार डोनेशन भरावी लागेल. शेखरचे मार्कस् चांगले म्हणून कमी. एरवी लाख-दीडलाख लागले असते."

 "बाप रे, दीड लाख ?"

 "आप्पा, तुमच्या एकसष्ठीला कशी तुमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ६१ हजाराची थैली दिली, तशी आता सत्तरी करायला हवी."

 शेखर गमतीने म्हणाला. पण सुलू उसळून म्हणाली, "वाऽरे चोरांनो, ते पैसे आप्पांनी या ब्लॉकसाठीच खर्च केलेत ते आहे ना लक्षात?”

 "अगं सुलू, तो गमतीने म्हणतोय. जयंता, तू पन्नास हजाराचं कर्ज मिळव. इंग्रजीचे क्लासेस काढतो. हां हां म्हणता पैसे फिटतील. उगाच इतकी वर्षे फुकट शिकवलं सगळ्यांना."

निखळलेलं मोरपीस / ७९