पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२. “थँक यू मि. डेथ !”


 जिना चढता चढता आप्पा पायरीवरच बसले. त्याना दरदरून घाम आला होता. जोराची धाप लागली होती.

समोरचे राघुअण्णा तेवढ्यात आले. पाणी प्यायला दिलं. फॅन सुरु केला. जोरदार वाऱ्याच्या झुळुकेने आप्पांना बरं वाटलं.

 "चक्कर आली का आप्पा?" राघुअण्णांनी विचारलं.

 "नाही रे, आज जरा जास्ती फिरलो म्हणून असेल कदाचित. तीनऐवजी चार फेऱ्या मैदानाला घातल्या. तेच बाधलं असेल. तू चल. तुझी ऑफिसची गडबड असेल ना?"

 "मी जातो. ऑफिसला जाताना अतुलला बघून जायला सांगतो. जयंताला यायला अजून तीन-चार दिवस आहेत."

 बरं"आप्पा हुंकारले.

 आता एक तासाची डुलकी काढल्यावर आप्पांना थोडी हुशारी वाटली. पण त्यांचं मन विचार करू लागलं. हल्ली वारंवार असं आपल्याला का बरं होतंय ? पंधरवड्यापूर्वीच अशीच आपल्याला घेरी आली होती. श्वास कोंडल्यासारखा वाटला. घाबरल्यासारखं वाटलं. जयंता-सुलुला उठवावसं वाटलं. पण निग्रहपूर्वक त्यांनी तो विचार टाळला. शक्यतो कुणाला त्रास न देण्याचा त्यांचा स्वभाव होता. दोघं बिचारे नोकरी करून दमतात. लोकल गाड्यांच्या धावपळीनं मेटाकुटीस येतात. आपली कटकट नको. आप्पांचं लक्ष सिंधूच्या हार घातलेल्या फोटोकडं गेलं. एक सुस्कारा टाकत ते म्हणाले, "काय म्हणतेस सिंधू ? तुझं बरं झालं. झटकन सुटलीस. मला पण पटकन् सोडव बघ. कुणाला त्रास नको."

 तेवढ्यात दार वाजलं. अतुल आला होता. निरोप मिळताच क्लिनिककडे जातानाच आलेला दिसतोय.

 "काय म्हणताय आप्पा?" त्यानं हसत हसत स्टेथेस्कोप काढला. नाडी बघितली. छाती, पाठ, पोट, तपासलं. थोडा गंभीर झाला.

निखळलेलं मोरपीस / ७७