पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थांबवला.

 त्याच दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद होता होता मॅनेजरनी मला बोलावून घेतलं. आणि त्या महाराजांची मी माफी मागावी अशी जवळजवळ ऑर्डरच दिली. नाही तर दूर जंगलातील कोंडवली- खोडाळा अशा आडवळणाच्या गावाला बदलीची गर्भित धमकी दिली. महाराजांच्या परिवारापैकी एक बाई त्यांच्या नात्यातली होती.

 तुझ्यामुळे आम्ही अडचणीत येतो म्हणून घरच्यांची कटकट चालू होतीच.

 हे सगळं झालं बाहेरचं. मुळात माझ्यात कुठं हिंमत होती वाटेल त्या परिस्थितीला तोंड देण्याची? कुठं होतं ते धाडस सर्व यातना सहन करुन ताठ उभं रहाण्याचं? आपली बेडकी घरातल्या घरातच उड्या मारणारी. सिंहाची गर्जना ऐकेपर्यंतच आपली कोल्हेकुई चालायची. त्या तेजस्वी पत्रकारीतेच्या जवळपास तरी जाण्याची आपली लायकी आहे का?

 आपली 'कुवत' पिवळ्या सरकारी कागदावर काळ्याचे पांढरे करण्यापुरतीच. अशी माझ्यातली पत्रकारिता गर्भातच गारद झाली!

 हल्ली हल्ली माझ्या घरासमोरच टोलेजंग बिल्डिंगचे काम चाललंय. अर्थातच अनधिकृत. माझ्या छोट्याशा गल्लीत बांधकामाच्या सगळ्या विटा, दगड, वाळू पडलीय. चालायला रस्ताच उरला नाही. मी एकदा घाईत निघालो तेव्हा त्या चिंचोळ्या पाऊलवाटेवरनं दोन तीन माणसं एकापाठोपाठ येत होती. कारण त्या सिमेंट विटांच्या गर्दीत रस्त्यावर तेवढीच वाट शिल्लक होती. मला पुढे जायला वाव मिळेना म्हणून थोड्या चिडक्या स्वरांत ‘जरा रस्ता द्या ना.' म्हणून खेकसलो. तेव्हा त्यातील एका माणसाने शांतपणे माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, 'अहो, आम्ही गरीब पादचारी, आमच्यावर खेकसताय, हिंमत असेल तर हा सगळा रस्ता बिल्डिंगच्या कामासाठी दगड विटा ठेवून अडविणाऱ्या त्या बिल्डरवर खेकसाना!'

 मी क्षणभर वर बिल्डिंगकडे बघितलं. तिथल्या शेठजींचा मुकादम कुत्सितपणे दात विचकून हसत होता.

 मी मान खाली घातली. महात्मा गांधीची ती तीन 'सुप्रसिद्ध' माकडे माझ्याकडंच रहायला आली होती!

माझी पत्रकारिता / ७६