पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुणगान केलंस त्याच्या अनधिकृत बिल्डिंगज् किती आहेत? त्या त्यानं कशा उभ्या केल्या, कोणा कोणाच्या जमिनी कशा हडप केल्या याचा शोध घे. डोळे उघडे ठेवून वागलास तर तुला खूप काही लिहायला मिळेल. मात्र त्या शामकांताची संगत सोड. या साऱ्या धनिकांचा तो दलाल आहे. तुला तो नुसता 'वापरतोय'. कुणाचं मिंधत्व पत्करायचं नसेल, जीवाची तमा बाळगायची नसेल, तरच पत्रकार बनायचा प्रयत्न कर.

 सत्यमूर्तीने माझी चांगलीच निर्भत्सना केली होती. तिखट शब्दांत खरडपट्टी काढली होती.

 पण ते सगळे खरे होते.

 दोन दिवसांनी एका आवेशासरशी मी मुंब्रा गाठलं. मुद्दाम शामकांतला न सांगता गेलो. सत्यमूर्ती म्हणाला तशी चौकशी सुरू केली. शंकरदादाचे लोक माहिती देईनात तेव्हा त्याच्याशी उभा दावा असलेल्या चुलतभावाकडे निघालो. त्याच्याकडून जी माहिती मिळाली ती भयानक होती. शंकरदादा एवढा नीच आणि ढासळलेला माणूस असेल याची मला कल्पनाच नव्हती.

 बराच ‘मालमसाला’ मिळवून मी परतलो. आता थेट के. सत्यमूर्तीच्या शैलीत शब्दांचे फटकारे मारायचे म्हणून जेठा मारून रात्री लिहायला बसलो. त्याच रात्री माझ्याकडे तिघेजण आले. दोन धटिंगण मवाली दिसत होते तर एक त्यातल्या त्यात जंटलमन दिसत होता. त्यानं माझ्या टेबलावरची टिपणं वाचली आणि टरकन् फाडली. मी काही बोलायला तोंड उघडणार तो एका धटिंगणानं फाडकन् माझ्या श्रीमुखात भडकवली. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. दुसऱ्याने माझी शर्टची बाही पकडली. गुर्मीत तो जंटलमन म्हणाला, 'अहो रायटर, मुंब्रा-दिव्याच्या खाडीतून आम्ही रेती काढू, नाही तर सोनं काढू. पण तू काही लिहायच्या फंदात पडशील तर या सुऱ्यानं तुझा कोथळा काढू.' आयुष्यात एवढा धारदार सुरा मी प्रथमच पहात होतो. माझ्या उत्तराची वाट न बघता आले तसे पाच मिनिटांत ते सर्वजण गेले.

 मी हबकलोच. माझी खोली एका बाजूला असल्याने घरच्या कोणाला पत्ता लागला नाही.

 एक दोन दिवसांत तीन बायका आल्या. अणि घरात त्यांनी खूप कलकलाट केला. आरडाओरडा केला. त्यांच्या एका महाराजांच्या विचित्र वर्तणुकीच्या संबंधात मी लेख लिहिला होता. त्या संदर्भात अब्रुनुकसानीचा दावा गुदरण्याची त्या धमकी देत होत्या. मी माझी माहिती कशी बरोबर आहे आणि कुणाकडून मिळाली वगैरेचा खुलासा करत होतो. म्हणजे तसा प्रयत्न करत होतो. पण आमच्या गल्लीत जसजशी बघ्यांची गर्दी वाढायला लागली तशी घरच्या मंडळींनी दादापुता करुन त्या बायकांचा ओरडा

निखळलेलं मोरपीस / ७५