पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गिफ्टस् वाटण्यात आल्या. कंपनीच्या नव्या प्रॉडक्टची माहिती पुरविणारं लिटरेचर आम्हाला पुरवण्यात आलं. मग दहा मिनिटं प्रेसिडेंटचं भाषण झालं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. कुणाला काही शंका असल्यास विचारायला सांगण्यात आलं. तशी कुणाला शंका नव्हतीच. पण त्यांनी आधी 'पुरवलेले' प्रश्न एक दोघांनी विचारले. प्रेसिडेंटनी 'गुड क्वेश्चन्स' म्हणनू कौतुक करून उत्तरे दिली.

 अर्ध्या तासात प्रेस कॉन्फरन्स् खतम्.

 खरी पत्रकार परिषद नंतरच सुरू झाली! दुसऱ्या मोठ्या दालनात. एकजण म्हणाला, ‘चला थ्री पॉईंट फाईव्ह सुरू.' शामकांतनं खुलासा केला. व्हिस्कीचे तीन पेग आणि नंतरचा अर्धा पेग, स्पॉन्सरच्या भरभराटीसाठी! अशा पार्ट्या नेहमीच असतात. स्वत:वर बंधन रहावं म्हणून थ्री पॉईंट फाईव्हचा फॉर्म्युला ! अर्थात एकदा विमान हवेत चढायला लागल्यावर कोण कशाची मोजदाद ठेवतोय? अचकट विचकट गप्पा. पत्रसृष्टीतील लफडी आणि भानगडी.

 शामकांतला जाताना मी म्हटलं, 'प्रेसिडेंटच्या भाषणाच्या आधारे मी माझा 'रायटप' तयार करतो. जिथं द्यायचा तिथं तू दे.' त्याने मला वेड्यात काढलं. म्हणाला, 'अरे ते लिटरेचर दिलंय ना, तेच द्यायचं असतं आपला प्रेस रिपोर्ट म्हणून.'

 अशी माझी पहिली प्रेस कॉन्फरन्स. शामकांताच्या मदतीने माझी पत्रकारिता सुरू झाली. रांगू लागली. चालू लागली. पण 'पिऊ' लागली हे मात्र वाईट झालं!

 दरम्यानच्या काळात माझी के. सत्यमूर्तींची ओळख झाली. सडाफटींग आणि कलंदर माणूस. अंगापिंडानं एकदम फाटका माणूस. पण भल्या भल्यांना त्याचा वचक वाटे. दरारा जाणवे. त्याची लेखणी तेज होती. एखाद्या शहाळीवाल्याने सपासप धारदार चाकूने शहाळ्याचे छिलके काढावेत तसे त्याचे लेखणीचे फटकारे एकेकाच्या लफड्याचे सालटे काढत असे. त्याची शोध-पत्रकारिता मला फार आवडायची. त्याची लिहिण्याची स्टाईल आवडायची म्हणून त्याची आर्टिकल्स मी पाठ करत असे. त्याचे मार्गदर्शन मिळवावे म्हणून मी आवर्जून त्याच्याकडं गेलो.

 पहिल्या भेटीतच त्यानं मला फटकारलं. म्हणाला की, 'तुझ्यासारखे लोक पत्रकार या अर्थाने एकदम कुचकामी आहेत. नुसतं प्रत्येकाविषयी गोडगोड लिहून तुलाच एक दिवस अजीर्ण होईल. तू गोंडस शब्दांत ज्यांच्याविषयी लिहितोस ते सगळे तुरुंगात डांबून ठेवण्याच्या लायकीचे आहेत. तुला खरोखरच शोध-पत्रकारीतेचे अप्रूप असेल तर तुझ्या त्या शंकरदादानं इतरांना डावलून खाडीतून किती रेती उचलली त्याचा शोध घे. त्याचा रेती उचलायचा लायसेन्स केव्हा संपलाय ते बघ. नंतर तू ज्या हरीभाई पटेलचं

माझी पत्रकारिता / ७४