पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अतीच होतं. पण आता मी, कोळ्याच्या जाळ्यात अडकावं तसं शामकांतच्या रुटीनमध्ये सापडलो होतो. त्याच्या मदतीनं एका ध्येयवादी डॉक्टरच्या जीवनावरची माझी कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होण्याची शक्यता होती. पत्रसृष्टीतील बड्या धेंडांची शामकांताशी जवळीक होती. त्यानं पुढं केलेल्या शिडीच्या आधारानंच मला वर चढायचं होतं. नाही तर मी एकटा काही करू शकत नव्हतो. मी होतोच कोण? शामकांताच्या पांगुळगाड्याशिवाय मला एक पाऊलही पुढे जाणे शक्य नव्हते.

 मी मुकाट्याने शंकरदादावर लेख लिहायला सुरुवात केली. एक दिवस रविवारी दुपारीच शामकांत माझ्याकडे आला. मला म्हणाला, 'चल, तुला पाहिजे तशी पत्रकारितेची संधी आली आहे. '

 मी, प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडं पहात राहिलो. त्याला ते आवडलं नाही. स्वाभाविक होतं. त्यानं उठ म्हटलं की उठावं, बस म्हटलं की बसावं असा त्यानं अधिकार माझ्याबाबतीत प्राप्त करुन घेतला होता. निदान तशी त्याची समजूत होणं रास्त होतं.

 मी जरा घुश्श्यात 'नाही' म्हणायच्या मूडमध्ये होतो. पण त्याच्या शब्दांनी चमकलो.

 'ताजमहाल हॉटेलात पार्टी आहे. एक औरंगबादची पार्टी आहे. अमेरिकन कोलॅबरेशनने प्रॉडक्ट सुरू करतेय. मोठमोठे पत्रकार यायचे आहेत.'

 'पण मी कुठं पत्रकार आहे? कुठल्या नात्यानं मी यायचं?'

 'मग मी कशाला xxxx बसलोय का इथं? एका वृत्तपत्राचा प्रतिनिधी यायचा नाही. त्याच्या जागी तुला नेतोय. चल, लवकर तयार हो.'

 जास्ती बोलण्यात अर्थ नव्हता. मी तयार होऊन निघालो.

 मुंबईत राहून मुंबईचं जगविख्यात ताजमहाल हॉटेल मी प्रथमच पहात होतो. पत्रकार परिषदेचे आकर्षण होतंच. एका मोठ्या दालनांत आम्ही जमलो. अमेरिकन पाहुणे यायला वेळ होता; तोवर कोल्ड्रिंक्स पीत, वेफर्स, काजू तोंडात टाकत सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मी इकडे तिकडे हिंडून ताज, न्यू ताज दिसेल तेवढं बघून घेतलं.

 कोपऱ्यावरचा स्वीमींग पूल बघितला. मुक्तपणे खिदळणारे पोहणारे परदेशी नागरिक बघितले. जास्ती वेळपर्यंत पहायला आवडलं असतं पण तेवढ्यात कंपनीचे अमेरिकन प्रेसिडेंट आल्याचा गलका झाला. आम्ही आपापल्या वृत्तपत्रांच्या अधिकृत जागेवर बसलो. ऑफिशिअली मी मि. जॉन सायमन होतो! एका इंग्रजी वृत्तपत्राचा प्रतिनिधी.

 प्रेसिडेंटनी आमचा आधीच सत्कार केला. एका आकर्षक खोक्यातून सर्वांना

निखळलेलं मोरपीस / ७३