पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या उद्योगपतीची, दगडूशेठची एकसष्टी होती. भली दांडगी पार्टी होती. मला आवर्जून आमंत्रण होतंच. मी शामकांतबरोबर गेलो. यजमानांनी माझ्या हातावर पाचशे रुपये ठेवले तेव्हा मी उडालोच!

 शामकांत म्हणाला की अशा पार्ट्या म्हणजे किस झाड की पत्ती ? त्यांच्याकडं काळा-गोरा पैसा आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठा हवीय आणि ते काम तुझ्या लेखानं केलंय.

 त्या पार्टीत ज्याला त्याला तो दगडूशेठ माझी ओळख 'रायटरसाब' म्हणून करून द्यायचा. मग शामकांताच्या शब्दांत सांगायचं म्हणजे मला तिथं अनेक ऑर्डर्स गिळाल्या. कुणा उद्योगपतीची पंच्याहत्तरावी, तर कुणाच्या उद्योगाचा रौप्यमहोत्सव. कुणाचं परदेशगमन तर कुणाचं परदेशातून आगमन. रंगीबेरंगी फुलं, निळं आकाश, हिरवीकंच झाडी, चंद्र तारे, सारे सारे मी विसरलो! लोखंड, सिमेंट, हळद, तंबाखू, खाडीतील रेती, वाळू अशा विषयांवर, त्यांच्या मालकांवर मी लिहित होतो. शामकांत सांगत होता त्याप्रमाणे. तो कुठून कुठून छापून आणायचा. नाही म्हटलं तरी मनाला आतून खटकत होतं. वृत्तपत्रातून 'व्यक्तीविशेष', 'व्यक्तीवेध' अशा सदरांतून माझं नाव झळकत होतं तरी मनाला आनंद नव्हता की समाधान नव्हतं. असली कसली पत्रकारिता? पण मग माझं दुसरं मन मला समजावी. काही काही अभिनेत्री नाही का आधी देह प्रदर्शन करून सिनेमासृष्टीत प्रवेश करतात. जरा नाव मिळालं की मग आपली अभिनयसंपन्नता दाखवून मान्यता मिळवतात. लोक त्यांना डोक्यावर घेतात. मागचं सगळं विसरलं जातं. तसंच माझं आहे. आधी या प्रचंड वृत्तपत्रक्षेत्रांत मला उभं तर राहू ते. मग मी पण चांगल्या पत्रकारितेचा अविष्कार करायला लागेन! एक दिवस नक्कीच मी अरुण शौरी बनेन. कुलदीप नय्यर बनेन.

 दरम्यान शामकांत मला मुंब्रा-दिवा या बाजूला घेऊन गेला. भली मोठी पसरलेली खाडी, त्यातून निघणारी रेती, मोठमोठे ड्रेनर्स, तो रात्रंदिवस चालणारा प्रचंड उपसा, पाण्यात डुब्या मारणारे, तिथंच झोपड्या टाकून राहणारे मजूर हे सगळे मी सूक्ष्मपणे बघितलं. डोळ्यांच्या कॅमेरात बंदिस्त केलं. अनेकांशी बोललो, टिप्पणे काढली. शामकांतच्या कॅमेऱ्याने सगळ्या परिसराचे फोटो टिपले. या विषयावर काम करायला मला आवडणारं होतं. मोठी माहितीपूर्ण लेखमाला तयार करता येणार होती. पण मालक शंकरदादा त्याविषयी फारसे उत्सुक दिसले नाहीत. शामकांत म्हणाला की तू आधी शंकरदादांवर गौरवलेख लिही. बाकी तुझ्या मनात आहे ते आपण नंतर लिहूच. मला हे विशेष पसंत नव्हते. एक तर मनाला अजिबात न भावलेल्या लोकांबद्दल लिहायचं; त्यांना शब्दांनी गोंजारायचं; त्यांच्यात नसलेले गुण त्यांना चिकटवायचे म्हणजे जरा

माझी पत्रकारिता / ७२