पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११. माझी पत्रकारिता


 पत्रकारितेचं आकर्षण मला पहिल्यापासून होतं. पण नेमकं काय करावं म्हणजे पत्रकार म्हणून मिरवता येईल हे काही मला फारसं उमगत नव्हतं. त्यामुळं पत्रकारितेत उडी वगैरे मी काही मारली नाही. फुटकळ लेखन मात्र करत राहिलो. दिवसभर कारकुनीचे लेखन आणि शनिवार-रविवार घरची कामं आटोपून आपल्या आवडीचं लिखाण असा क्रम मी चालू ठेवला. मधून मधून कविता, लेख, लघुकथा छापून यायच्या. लिहितांना आपलं लिखाण अगदी ग्रेट आहे. सर्वत्र त्याची चर्चा होणार, बोलबाला होणार, कोण बरं हा लेखक अशी चर्चा होणार अशा स्वप्नरंजनांत मी असायचा! पण पोस्टमननं 'साभार परत' आसं पुडकं घरात फेकलं की मग मी जमिनीवर यायचा! बरं, त्यातून काही छापून आलं, कोपऱ्यात आपलं नाव बघितलं की धन्य वाटायचं. पण इतरांच्या ते गावीही नसायचं.

 पण लिहिण्याची उर्मी गप्प बसू देत नव्हती म्हणून लिहित राहिलो.

 मात्र जगात एक व्यक्ती कौतुकानं माझा खटाटोप पहातेय याची मला कल्पनाच नव्हती.

 एक दिवस शामकांत मला म्हणाला, 'तुझ्या कविता, लघुकथा चांगल्या असतात पण तू आता पत्रकारितेत शिर.'

 मी उडालोच. हा एवढं माझ्या मनांतलं कसं बोलतोय? त्याची कसली तरी जाहिरात संस्था होती. त्याच्याकडं बड्या बड्या उद्योगांचं आणि उद्योगपतींची जाहिरात करण्याचं काम होतं. त्यानं मला एका उद्योगपतीकडे नेलं. त्याच्या अनेक उद्योगांची माहिती दिली. माहितीपत्रकं दिली. त्या उद्योगपतीच्या आलिशान चेंबरमध्ये बसून त्याची मुलाखत झाली. आणि मग मी शामकांतने सांगितलं त्याप्रमाणं मालमसाला वापरून त्याच्यावर लेख लिहिला. शामकांतकडे दिला.

 ‘साभार परत' अशा भीतीपोटी रोज मी पोस्टबॉक्स घाबरत घाबरतं उघडत असे.

 आणि एक दिवस त्या उद्योगपतीच्या फोटोसह माझा लेख मी एका प्रचंड खपाच्या वर्तमानपत्रांत बघितला. ह्याच वृत्तपत्रानं माझे अनेक लेख धाडकन परत पाठवले होते!

निखळलेलं मोरपीस / ७१