पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिले. माझ्या साऱ्या सर्दीचे कारण ह्या कफाच्या ठायी आहे तर ?

 हा कफ शरीरात 'काँग्रेसी गवतासारखा' माजलेला आहे. छाती, आतडी, मेंदू ह्या सर्व ठिकाणी तो अजगरासारखी वेटोळी घालून बसलाय. ह्या कफरूपी खलपुरुषाला 'बाहेर' काढल्याशिवाय सर्दी जाणार नाही ह्या विचाराने मी एवढा प्रभावीत झालो की माझ्या ‘कफनिर्मूलन-समितीचे' तहहयात अध्यक्षपदच मी या माझ्या मैत्रिणीला देऊन टाकले! तेव्हापासून तेलकट पदार्थ वर्ज्य केले. काकडी, गाजर, मुळा, कच्चा कोबी, बीट, सर्व फळे ह्या साऱ्या पदार्थांस भोजनात अग्रस्थान दिले. माझी मैत्रीण वेळोवेळी माझी प्रगती पहायची. त्यानुसार कधी माझा कफ वरच्या बाजूस सरकायचा, तर कधी मानेच्या मागच्या बाजूस. कधी डोक्यात मेंदूच्या बाजूने जायचा तर कधी छातीभोवती · गोळा व्हायचा. एकंदरीत जाम टरकला होता, त्यामुळे अक्षरश: माझ्या शरीरात मोठी ‘कफपरेडच' चालू होती म्हणानात.

 कफावर केलेल्या हल्ल्यामुळे आणि मोर्चेबंदीने तो आता काढता पाय घेण्याच्या मार्गांवर होता. आता शेवटचा निकराचा हल्ला चढविण्याची तयारी सुरू केली, दोन- तीन दिवस टर्कीश टॉवेल पाण्यातून पिळून काढून छातीवर ठेवले, पोटावर ठेवले. गळ्यावर ठेवले. आता कफ नेस्तनाबूत होणार या विचाराने मी अतिशय उत्तेजित झालो होतो. पण हाय रे दुदैवा, मलाच सडकून ताप भरला. हुडहुडी भरली. दुखणं न्युमोनिआवर जाईल या काळजीने घरच्यांनी धावाधाव केली. पुन्हा डॉक्टर, हॉस्पिटल, टॅबलेटस्, इंजेक्शन्स् ह्या चक्रव्यूहात मला अडकवले गेले.

 आता मी एकंदरीत बरा आहे. What Can't be cured must be endured हे आता मला पटलेले आहे. ही सर्दी माझी चिरकालीन 'सखी' आहे. अॅलोपॅथी होमिओपॅथी, नॅचरोपॅथी कोणीही तिला माझ्यापासून हिरावून नेऊ शकणार नाहीत. ही जाईल ती माझ्याबरोबर 'वर' जाईल! जमा केलेला पैसा, दागदागिने, पॉलिसी, शेअर्स, कोणी अखेरीस माझ्याबरोबर येणार नाहीत. खुद्द माझी धर्मपत्नीसुद्धा माझ्याबरोबर 'सती' बनून येणार नाही. येईल, अखेरपर्यंत साथ देईल ती माझी सखी - सर्दीच!

 हा ‘साक्षात्कार' झाल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. माझ्या सखीला उद्देशून गहिवरल्या स्वरात म्हटलं, 'हे प्रिय सखे, दुनियाकी कोई ताकद हमें जुदा नही कर सकती!'

 त्याच क्षणी माझ्या सखीनं मला मनोमनीची खूण पटल्याची साद दिली! कारण त्याचवेळी मला फटाफट तीन शिंका आल्या!

 'त्रिवार' सत्य आहे ना?

माझी अतूट सखी- सर्दी / ७०