पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकवटून त्या स्पेशॅलिस्टला म्हटलं, 'समजा नाही ऑपरेशन केलं तर काय होईल?'

 तेव्हा तो शांतपणे म्हणाला, 'मग हळू हळू दुसऱ्या नाकपुडीतहि 'पॉलिप्' तयार होईल. आता थोडासा श्वसनमार्ग चालू आहे तो पूर्णपणे बंद होईल. आणि मग हळूहळू.. पुढचं 'मरण' टाळण्यासाठी मी ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटल मध्ये धाव घेतली!

 आणि इथूनच त्या न परतीच्या रस्त्याला मी लागलो. हॉस्पीटलमधील पहिल्याच दिवशी माझ्या शेजारच्या बेडवरील एका सिंधी म्हाताऱ्याने माझी 'सर्द-कहाणी' ऐकून भाकित केले. तो म्हणाला 'बेटा कुछ नही फरक पडेगा! ये सर्दी जैशी की तैसी रहेगी! ये डॉक्टरलोग हमें ऐसेहि फसाते है!' ऑपरेशन झाले. पॉलिप् निघाला. आठ दिवस हॉस्पिटलमध्ये काढून घरी आलो. शांत झोप काढली आणि हाय रे दुर्दैवा! सखी सर्दी सुहास्य मुद्रेने स्वागतास हजर!

 ऑपरेशननंतर सर्दी कायमची जाईल म्हणणाऱ्या त्या स्पेशालिस्टकडे रागाने गेलो तो तोच बिचारा 'कायमचा' गेल्याचे कळले. (प्रभूची इच्छा!) ईश्वरेच्छेने तो डॉक्टर कायमचा गेला पण माझी सखी मात्र आता कायमची मुक्कामाला आलीय. ऑपरेशन- पूर्व काळातील तिच्या सर्व 'लीला' पुन्हा सुरू झाल्या आहेत. पूर्वी ती थोडी ‘अमूर्त स्वरूपात वावरायची. आता तिची भीड चेपली म्हणा वा सुडबुद्धीने म्हणा, आता ती 'मूर्त' स्वरूपात वावरते. 'मूर्तिमंत सर्दी उभी' अशी माझ्या नाकाची 'स्थिती' असते!

 वास्तविक माझे नाक एखाद्या चिनी वा जपानी सम्राटासारखे आहे. (नुसतेच नाक बसके आहे, चपटे आहे असे सांगितले की तुम्ही कुचेष्टेने बघाल म्हणून माझ्या नाकाचे हे उदात्तीकरण!) एवढ्या छोट्या 'वास्तूत' एवढी प्रचंड 'सर्दी' कशी 'गर्दी' करून राहते ह्याचा मलाच अचंबा वाटतो! जगातील उच्चयावत 'ओलावा' माझ्याच श्वसनेंद्रियाच्या अंतर्भागात 'गिलावा' करण्यासाठी हजर झालाय अशीच मला कधी कधी शंका येते!

 मध्यंतरीच्या काळात आमच्या ऑफिसच्या कुलाब्याच्या 'कफ-परेड' ब्रँचमध्ये काम करणारी एक सहचरी माझ्या सेक्शनमध्ये आली. एका जीवघेण्या आजारात प्रत्यक्ष मृत्यूशी ती 'शेकहँड' करून आल्यापासून अॅलोपाथी डॉक्टर्स, हॉस्पिटलस् या साऱ्यांचा ती भयानक तिरस्कार करते. आता ती नॅचरोपाथी हा एकमेव आपला 'पंथ' मानून निसर्गोपचारावरची मोठमोठे ग्रंथ वाचत असते.

 माझ्या सर्दभऱ्या कहाणीने आणि मी पण डॉक्टर्स आणि अॅलोपाथीची औषधे याबाबतीत कडवटपणा धारण केलेला असल्यामुळे थोड्याच काळात आमच्यात 'दर्द का रिश्ता' निर्माण झाला! माझं सगळं ऐकून घेतल्यावर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'अरे, हा साऱ्या त्या कफाचा परिणाम.' मग तिने शरीरातील कफदोषावर दीर्घ व्याख्यान

निखळलेलं मोरपीस / ६९