पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फारच वाढायला लागला. मग व्हिक्स फॉर्म्युला ४४, ग्लायकोडिन अशा आंग्ल वस्तूंची त्यांना चटक लागली. डॉक्टरांकडे एकसारखं जाणं आवडायला लागलं मग स्टेथेस्कोपने छाती तपासून घे, एक्स रे काढून घे अशा 'चाळ्यांची' गरज वाटायला लागली!

 एक मात्र बघितलय. डॉक्टर मंडळी कांही म्हणोत पण त्यांना ह्या बहीण-भावांनी तशी कधीच दाद दिली नाही! त्यांच्याच मनात यायचं तेव्हांच आणि फक्त तेव्हाच ही बहीण भावंडं निघून जायची! आम्ही मात्र उगाचच डॉक्टरांच्या 'करणीला' घाबरली असं म्हणून स्वत:ची फसवणूक करून घ्यायचो

 असेच दिवस गेले. चाळीशी उलटली. बालपणीची ही 'सखी' मनाच्या सांदीकोपऱ्यातून साऱ्या शरीरभर हातपाय पसरायला लागली. मग आम्ही सर्दीनं घसा धरलाय. सर्दीन डोकं दुखतंय. सर्दीनं अंग मोडून आलंय. असं म्हणायला लागलो. डॉक्टरांकडील आणि त्यांच्या स्पेशॅलिस्ट जमातीकडील फेऱ्या वाढल्या. मग अॅलर्जीचा शोध लागला. सर्दीला दह्याची अॅलर्जी आहे, धुळीची अॅलर्जी आहे, केळाची अॅलर्जी आहे, सर्दीला आईस्क्रिम अजिबात नको अशी भाषा सुरू झाली. पुढे पुढे तिच्या पाठोपाठ तिचा खट्याळ भाऊ येईल या भितीने भजी नकोत, बटाटेवडे नकोत. चिवडे नकोत, सगळं बिनतेलाचं हवं, असं सगळं 'हवं-नको' सुरू झालं.

 वास्तविक एकेकाळी हिमालयात जाऊन बर्फात ट्रेकिंग करून आलेला माणूस मी. पण या सखीनं मला अगदीच बापुढवाणं करून टाकलं. रात्री झोपताना मी विक्सचा वाफारा घ्यायचा. झोपताना गळ्याभोवती मफलर, कानात कापसाचे बोळे, डोक्याला घट्ट बांधलेला मऊ रुमाल, पायात पायमोजे अशा पक्क्या 'संरक्षणात' झोपायला लागलो! पण इतक्या कडेकोट बंदोबस्तातून' सकाळी उठावे तो डोळे बारीक झालेत. नाकावर आणि डोळ्याच्या खाली सूज आलीय. डाव्या डोळ्याच्या वर कपाळ दुखतेय. डोळे आणि नाक गळतेय. नाक एका बाजूने चोंदलेय. अंग मोडून आलंय. सर्वांगाला थंडी वाजतेय. अशा अवस्थेत माझं रोजचं 'सुप्रभात' व्हायला लागलं.

 पुढे पुढे तर नाक असं चोंदायला लागले की, रात्र रात्र झोप येईना. आपण कलकत्त्याच्या त्या कुप्रसिद्ध अंधारकोठडीत अडकलेल्या कैद्यासारखे श्वास घुसमटून जाणार अशीच एकसारखी भीती वाटायला लागली. नाकात कागदाची बारीक सुरळी घालून भरपूर शिंका काढाव्यात तेव्हा कोठे थोडं हलकं वाटायचं. पण असे किती दिवस काढणार? काही केल्या नाकातून 'चोंदणकर' महाराज मुक्काम हलवायला तयार होईनात! मग मोठे मोठे स्पेशॅलिस्टस् गाठले. नाकाचे एक्स रे काढले. या साऱ्या 'मंथनातून' माझ्या डाव्या नाकपुडीत 'पॉलिप्' वाढलाय असे 'निदान' झाले, आणि तो ऑपरेशन करूनच काढायला हवा असंहि ठरलं. या निर्णयाने मी घाबरलो. धीर

माझी अतूट सखी- सर्दी / ६८