पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०. माझी अतूट सखी - 'सर्दी'


 साध्या सर्दीला कंटाळून कुणी आत्महत्त्या केली असं कधी तुम्ही ऐकलंत? नाही ना? मग आता तसा 'योग' लौकरच येईल. हो, म्हणजे अस्मादिकांच्याच बाबतीत! 'इतका सर्दीने मी बेजार झालोय. ऑफिसात बसलं की एअरकंडिशनचा त्रास. लोकलमध्ये गार वाऱ्याचा त्रास तर कधी डोक्यावरच्या पंख्याचा. घरी तर सारीचजणं पंख्याचे 'फॅन' आहेत. त्यामुळे बघायलाच नको.

 खरं म्हणजे भीतीच बाळगायची तर ती कॅन्सर, टी.बी., हार्ट डिसिज्, हाय ब्लड प्रेशर अशा मोठमोठ्या अथीरथींचीच. पण साध्या सर्दीने आपल्याला सर्द करून टाकावे म्हणजे काय ?

 रात्रभर माचणावर शिकाऱ्याने क्रूरं नरभक्षक वाघांच्या प्रतीक्षेत सावधपणे डोळ्यात तेल घालून बसावं आणि एखाद्या य: किश्चित् माशीने त्याच्याभोवती घोंघावत त्याला हैराण केलं तर त्याला कसं वाटेल? तोच अनुभव, तीच चीडचीड सध्या मी अनुभवतोय. ऑफिसात कामावर लक्ष राहात नाही, घरी काही लिहायला-वाचायला सुचत नाही. कोठेच मन केंद्रित करता येत नाही. सगळा वेळ नाक साफ करायला नि खाकरायला.

 तशी सर्दी ही माझी बालपणापासूनची सखी. जाऊन येऊन असायची. तेव्हा या सखीचा कधी दुःस्वास करावासा वाटला नाही. उलट तिचं कौतुकच व्हायचं. आई चांगला गवती चहा द्यायची. रात्री निलगीरीचा वाफारा हळद-साखर मिश्रीत उकळलेले दूध. असा दोन चार दिवसांचा पाहुणचार घेऊन परत जायची.

 पुढे पुढे येताना आपल्या 'खोकला' नामक लाडक्या भावाला घेऊन यायची! बहीण पुढं यायची. आपलं दोन-चार दिवस कौतुक करून घ्यायची, मग भावाला 'ठेवून’ जायची. बहिणीच्या तुलनेत भाऊ मात्र महा खट्याळ. सदैव घशात मुक्काम ठेवून असायचा. दिवसा मधून खोकायचा पण दिवसभराच्या कामात त्याच्याकडं दुर्लक्ष होतंय असं दिसलं की रात्री हट्कून खनपटीलाच बसायचा! झोपू द्यायचा नाही. खोकून खोकून छाती वाजेपर्यंत लहान मुलासारखा अडेलतट्टूपणा करायचा.

 मग त्याच्या कुरबुरीकडं लक्ष द्यावंच लागायचं. गरम पाणी, त्यात मध, अडुळशाचा काढा, ज्येष्ठमध, खडीसाखर, असे घरगुती उपाय आई करायची. फार 'रागात' नसला तर एवढ्या सरबराईवर खूष होऊन जायचा. पुढं पुढं दोघंहि बहीण-भावंडांचा हटवादीपणा

निखळलेलं मोरपीस / ६७