पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ऐकवा."

 मी जोशीबुवांना त्यांच्यावरची कथा ऐकवली. त्यांनी लक्षपूर्वक ऐकली. आणि कागद हातात घेऊन म्हणाले,

 "कथेला शेवट नाही?"

 "शेवट कसला? एक व्यक्तीचित्रासारखं रेखाटलंय् झालं."

 "असं नको. माझ्यावर एवढी 'आयती' कथा रचलीत् निदान तुम्हाला 'आयता' शेवट तरी देतो!”

 मी बघतच राहिलो. जोशीबुवा माझ्या टेबलाशी बसले. एक-दोन कागदाचे ताव ओढले. भरभर लिहू लागले. त्यांच्याच शब्दांतील शेवट ऐका.

 "कोणता तरी सुटीचा दिवस होता. गोखल्यांची वृद्ध आई दोन दिवस जरा जास्तीच आजारी होती. सकाळपासूनच जोरदार धाप लागली होती. जाणकारांच्या मते पाच-सहा तास काढणे म्हणजे अगदी शिकस्त. वशा फाटक गोखल्यांच्या आईची 'प्रकृति' बघून बाहेर आला. बिल्डिंगमधल्या काही जणांना त्याने बाहेर काढले आणि म्हणाला,

 " म्हातारी दोन-चार तासांवर वेळ काढेल असं वाटत नाही. आपण आपलं पुढच्या तयारीला लागलेलं बरं."

 'पुढची तयारी' हा वशाचा अगदी खास अधिकाराचा विषय होता. आजूबाजूच्या परिसरात वसंता उपाख्य वशा हा 'वशा खांदेवाईक' म्हणनूच विख्यात होता. आजवर अनेकांना त्याने 'खांदा' दिला होता; नव्हे तो ते पवित्र कर्तव्यच मानत असे. आजारी माणसांनी तर त्याचा एवढा 'धसका घेतलेला होता की, तो कधी कुणा आजारी माणसाला नुसता 'बघायला' जरी गेला तरी त्यांना आपल्याला 'न्यायलाच' आलाय् असेच वाटे.

 गोखल्यांच्या ब्लॉकमधून तो बाहेर पडला तेव्हाच त्याचे डोळे 'लकाकत' होते. या ‘खेपेला' थोडं खास कारण होतं. आजवर त्यानं मोजून नव्याण्णव लोकांना खांद्यावरून 'पोचविले' होते. 'शतक' पुरे व्हायला एकाच 'विकेट' ची आवश्यकता होती. आणि आज तशी 'संधी' आली होती. सुटीचा दिवस असल्याने रजा पण घ्यावी लागणार नव्हती.

 एवढ्यात गोखल्यांच्या ब्लॉकमधून डॉक्टर बाहेर आले. एक दोघे जण चिंतातूर चेहेऱ्याने पुढे झाले. डॉक्टर हसले. म्हणाले की आता काळजीचे कारण नाही. इंजेक्शनला पेशंटचा चांगला रिस्पॉन्स आहे. धोका टळलेला आहे.






निखळले--: