पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोशीबुवांना नवल वाटत होतं. गेले दोन दिवस ते इतके बेचैन होते, की आपल्याइतका निराश माणूस जगात दुसरा नसेल असे त्यांना वाटत होतं. आणि या क्षणी या भूतलावर आपल्याइतका सुखी प्राणी कोणी नसेल असं त्यांना वाटायला लागलं. नशीब आपलं त्या वाटव्यांच्या मुलानं सुमनला बघितली नाही ते. बघितलं असतं तर नक्कीच त्यानं आपला बेत फिरवला असता!

 बघा म्हणजे अन्न, (अंग), वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही बहुमोल गरजा जोशीबुवांच्या‘आयत्या’ भागल्या. पण एरवीसुद्धा आमचे जोशीबुवा तसेच नशीबवान असतात. कधी कोणाचा आयत्या वेळी बेत कैंसल होतो म्हणून जोशीबुवांच्या हातात कधी सिनेमाची तर कधी नाटकाची तिकिटं पडतात तर कधी अशाच कारणानं मेहुण आलं नाही म्हणून त्यांना ‘आयत्या' वेळेचं मेहुण म्हणून जेवायला जावे लागते. जोशीबुवांचं एक बरं आहे. कोणताही कार्यक्रम ते ठरवून ठेवत नाहीत. केव्हाही तसे अव्हेलेबलच असतात. मोकळेच असतात. त्यामुळे कोणाकडे कधी पाहुणे वगैरे आले आणि नाटक सिनेमाची तिकिटं फुकट जायची वेळ आली तर जोशीबुवा वेळ मारून नेतात. मात्र तसे ते फुकटे मात्र नाहीत हं. पण त्यांच्या निष्पाप वृत्तीमुळे कोणालाच त्यांचेकडून पैसे घ्यायला आवडत नाही. आता पाहुण्यांवरून जोशीबुवांचा एक किस्सा आठवला तो सांगतो.

 एकदां काय झालं? रविवारचा दिवस होता अन् सकाळी साडे अकरा-बाराचा सुमार असावा. जोशीबुवांकडे जबलपूरहून अचानक चार-पाच पाहुणे आले. त्यांनी पाठविलेले पत्र जोशीबुवांना मिळालेलं नव्हते. जोशीबुवांच्या सासऱ्यांच्या ऑफिसमधील मंडळी होती. संध्याकाळी लागलीच त्यांना त्रिंबकेश्वरला जायचं होतं. आम्ही सारं बघत होतो. म्हटलं, चला आमच्या जोशीबुवांची जरा धांदल उडेल. जरा गंमत येईल...

 एवढ्यात समोरच्या ब्लॉकमधल्या गोखल्यांकडे तार आली. 'स्टार्ट इमिजिएटली. ' गोखल्यांच्या सासऱ्यांना अपघात झाला होता. गोडबोल्यांनी घाईघाईत टॅक्सी बोलावली. जोशीबुवांकडे घराच्या किल्ल्या द्यायला गेले. नेमके त्याच दिवशी गोखल्यांच्या पुतणीचे केळवण होते. जोशीबुवांकडे त्यांची पाहुणेमंडळी येऊन हाशऽहुश् करून बसतात न बसतात तेवढ्यात हा गोखल्यांकडचा प्रकार...

 मला वाटतं पुढचं काही सांगायलाच नको... जोशीबुवांकडची पाहुणे मंडळी श्रीखंडपुरी, भजी, पुलाव - चटणी कोशिंबीरीसह उभे आडवे हात मारत जेवली! निहायत खुष झाली. 'आयता' तयार स्वैपाक मिळाला.

 एक दिवस जोशीबुवांना मी बोलावलं. म्हटलं, 'जोशी बुवा, तुमच्यावर एक कथा रचतोय. ऐकवू का?"

आयता जोशी / ६४