पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलगी होती. इतकी गोड की कधी नव्हे ते आमचे जोशीबुवा मनोमन का होईना, पण पुरते विरघळले! ही मुलगी आपल्याला पत्नी म्हणून मिळाली तर किती छान होईल ? असा विचार मनात येऊन ते सुखावले. पण क्षणभरच. कठोर वस्तुस्थितीची त्यांना लागलीच जाणीव झाली. कारण त्या मुलीला एका 'स्थळासाठी' तिचे आई वडील तिला दाखवायला म्हणून घेऊन आले होते. त्या कटू जाणिवेने जोशीबुवा सैरभैर झाले. आयुष्यात प्रथमच ते इतके व्याकूळ झाले होते. पण काही इलाज नव्हता. निराशेने त्या दिवशी संध्याकाळी ते एकटेच दूरवर फिरायला गेले. मन शांत व्हावं म्हणून. संध्याकाळी घरी आले. दार उघडताच त्यांच्या आईने त्यांना बाजूला घेतले आणि हळूच विचारले.

 "मधू, ही दातारांची सुमन तुला कशी काय वाटते रे? मला खूप आवडलीय. सून म्हणून अशी मुलगी मला फार आवडेल.”

 " म्हणजे काय आई? तिला त्या वाटव्यांच्या मुलाला दाखवावला आणलंय ना?"

 " अरे हो, पण तिथलं सगळं फिसकटलंय बघ. मुलानं परस्पर कुठल्या तरी नोकरीवाल्या मुलीबरोबर जमवलंय म्हणे. सुमनचे आई-दादा अगदी खट्टू झाले बघ नकार कळल्यावर. जबलपूरच्या बाजूला महाराष्ट्रीय स्थळं मिळत नाहीत. ह्या वाटव्यांच्या स्थळाचं कळलं म्हणून इतके दिवस पत्रव्यवहार करून दाखवायला आले. त्यांना मुलीला ह्याच भागात द्यायचं फार मनात होतं. आणि पेन्शन घेतल्यावर इकडेच येऊन स्थायिक व्हायचं होतं. फार निराश झाली आहेत बघ. जबलपूर म्हणजे काय? जवळचा कां पल्ला आहे?"

 "पण तू काही विचारलंय का त्यांना?"

 “हो, त्यांना मी म्हटलं की मधुची तयारी असेल तर मला आवडेल तुमची सुमन सून म्हणून. दोघं इतकी गहिवरली म्हणतोस? एकटा मुलगा. सुसज्ज ब्लॉक. आणि तुझ्या वडिलांचा लहानपणाचा स्नेह. त्यामुळे ती दोघंना अगदी खूष आहेत. तुझ्याच होकाराची काळजी आहे त्यांना!”

 "आणि सुमन ? तिचे काय?" जोशीबुवांचा स्वर कधी नव्हे तो कातर झाला होता.

 "अरे तिचे काय? ती तुमच्या मुंबईच्या मुलीसारखी थोडीच आहे? तिला विचारूनच मी तिच्या आईशी बोलले. सुमनला घरसंसाराची फार हौस. नोकरी करायची अजिबात इच्छा नाही. मी म्हटलं आम्हांला कुठं आता ब्लॉक घ्यायचाय, म्हणून नोकरीवाली सून बघत बसू? आता तुझं बोल."

 "आता तुला पसंत आहे तऽऽर." कधी नव्हे ते जोशीबुवा लालीलाल झाले!

निखळलेलं मोरपीस / ६३