पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रिक्रुटमेंट टेस्टला बसायला नको की इंटरव्ह्यूला जायला नको. जोशीबुवांचे वडील अचानक गेले हे वाईट झालं. पण त्या वाईटातून चांगलं जन्माला आलं. जोशीबुवांना . नोकरी मिळाली, अगदी आयती. वडील युनियनमध्ये असल्याने जी काही थोडीफार खटपट करायची ती पण युनियनच्या कार्यकर्त्यांनी केली; जोशीबुवांचे काम फक्त समोर आलेल्या अर्जावर सही करणे एवढेच!

 मुंबईत रहायला जागा मिळविणे म्हणजे किती दुरापस्त. डिपॉझिट - पागडीच्या फेऱ्यातून गेल्याशिवाय जागा दिसत नाही! एखादी गृहनिर्माण संस्था बघावी, सभासद व्हावे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता करत करत पैसे भरावेत. कॉन्ट्रक्टर बरा भेटला तर ठीक आणि तसा बहुधा भेटत नाहीच. बिल्डिंग तयार होत आली की बरोबर तो खिंडीत पकडतो! अशा सगळ्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मनःस्तापातून जागा ताब्यात येईपर्यंत कोणीही माणूस अर्धमेला होऊन जातो. पण आमच्या जोशीबुवांचे नशीबच आगळे. जोशीबुवांच्या ऑफिसांतील मंडळींनी अशीच एक हाऊसिंग सोसायटी स्थापन केली होती. गेली चार-पाच वर्षे अविश्रांत परिश्रम करून आता त्यांची बिल्डिंग उभी राहिली. मेंबर, म्हणजे पैसा भरू शकणारे. मेंबर गोळा करणे, प्लॉट शोधणे, एन. ए. करणे, सोसायटी रजिस्टर्ड करणे, कॉन्ट्रॅक्टर शोधणे, त्याच्याशी वितंडवाद, हिशोबाच्या झटापटी, मेंबर मंडळींची आपापसांतील भांडणे ह्या सर्व दुष्टचक्रांच्या चक्रव्युहांतून गेल्यावर आता बिल्डिंगचे 'पझेशन्' घेण्याचा सुवर्णक्षण जवळ आला आणि एका मेंबरला राजीनामा देण्याची बुद्धी झाली! सोसायटीचे हप्ते, बँकेचे हौसिंग लोन, दर महिन्याचा मेंटेनन्सचा खर्च ह्या साऱ्याचे म्हणे त्याला एकदम 'टेन्शन' आले! तसा तो माणूस पहिल्यापासून रडत होता पण इतर मेंबर्सनी त्याला दादापुता करत, विनवण्या करत संभाळले; पण आता प्रत्यक्ष घोड्यावर बसायची वेळ आली तेव्हा हे रडतराऊत गडबडले.

 नेमके ह्याच वेळी जोशीबुवांच्या हातात दिवंगत वडिलांचे प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटीचे पैसे आले. सोसायटीला मेंबर हवा होता आणि बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेतलाच हवा होता. जोशीबुवांकडे एकदम सगळे पैसे भरण्याची 'ऐपत' आली आहे हे सोसायटीला माहीत होते. सोसायटीच्या मेंबरांनी जोशीबुवांना गळ घातली आणि जोशीबुवांनाही नाही म्हणण्यासारखे त्यात काही दिसले नाही. आणि आजमितीला पंचवीस हजाराच्या त्या ब्लॉकची किंमत, लाख-दीड लाखावर चढून बसली आहे! असा 'तय्यार' ब्लॉक आपला देह जरासुद्दा इकडचा तिकडे न हलवता जोशीबुवांच्या ताब्यात 'आयता' हातात आला!

 जी गोष्ट जागेची, नोकरीची तशीच छोकरीची. एकदा जोशीबुवांकडे जबलपूरहून त्यांच्या वडिलांचे जुने स्नेही आले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि सुस्वरूप उपवर

आयता जोशी / ६२