पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९. आयता जोशी


 आमच्या जोशीबुवांना 'आयता' जोशी म्हणतो तो केवळ त्यांची देहयष्टी 'आयताकृती' आहे म्हणून नव्हे. पण आयुष्यात सगळं काही त्यांना 'आयतं मिळत गेलं. म्हणजे तसा हा जोशी 'आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा आहे असं तुम्हाला वाटलं तर मात्र तुमचा तो गैरसमज ठरेल. पण त्याचं बेटं नशीबच असं सुदैवी आहे की आयुष्यांतील महत्त्वाची संधी त्याच्याकडे आपल्या पायाने चालत येते.

 आता मुंबईसारख्या ठिकाणी घर मिळणं, नोकरी मिळणं सोपं कां आहे? किती ठिकाणी अर्ज पाठवा, मुलाखतीला जा किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या दारावर शेकडो फेऱ्या मारा. शेवटी उपयोग शून्य. नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. छोकरी नाही - म्हणून घरसंसार नाही. वैतागून मुंबईचा अथांग समुद्र जवळ करावा किंवा गगनचुंबी इमारतीवरून स्वत:ला फेकून द्यावे असं वाटण्याइतकी परिस्थिती अनेकांच्या वाट्यास येते; पण आमचे जोशीबुवा अगदी 'आयते' आरामात एका खुर्चीत बसले. म्हणजे त्याचं असं झालं.

 जोशीबुवा सिद्धार्थ कॉलेजात ज्युनियर बी. ए. च्या वर्गात होते. बुद्धि तशी सर्वसाधारणच. नियमितपणे वर्षाच्या वर्षाला पास होत गेले एवढीच त्यांची जमेची बाजू. साध्या बी.ए.ला कोण विचारतोय? या अफाट विश्वात हे कसे काय तगणार ह्याची जोशीबुवांच्या इतर मित्रमंडळींना काळजी पडलेली असे. पण जोशीबुवा निवांत असत. कोणतीही काळजी फार काळ त्यांच्या मनात राहूच शकत नसे. शेवटचे वर्ष पार पडले; तेव्हा रिझल्ट लागायच्या मधल्या काळात आपणही इतर मित्रांसारखी नोकरीसाठी धडपड करावी असं त्यांना वाटू लागले. प्रत्यक्ष अशा कामाला सुरूवात करणार तेवढ्यात एक दुर्घटना घडली. जोशीबुवांचे वडील अचानक हार्टअॅटॅकने गेले. ते युनियनचे कार्यकर्ते होते. युनियनच्या कामासाठी मिटींग चालू असताना एकाएकी अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टर येईपर्यंत खेळ खलास. त्यावेळी ते काम करीत असलेल्या बँकेत एक नवीन नियम झाला होता. बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीत असताना मृत्यू आला तर त्याच्या सज्ञान मुलाला/मुलीला 'कॅम्पॅशिनेट ग्राऊंडवर' म्हणजे निव्वळ दयाबुद्धीने नोकरी द्यायची. मग तो पाल्य नुसता मॅट्रिक असला तरी पुरे. मग मात्र त्याला बँकेच्या

निखळलेलं मोरपीस / ६१