पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहोत ते सार्वजनिक सुरक्षेस्तव सांगता येणार नाही. पण काय काय केले ते दर तीन महिन्यांनी सांगितले जाईल. आपण राष्ट्रीय कौन्सिलला संपूर्ण सहकार्य करावे, आमच्यावर विश्वास ठेवावा, असे संयोजक म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करतो.

 जयहिंद.... भारत माता की जय !

 भाषण संपताच मी उत्स्फूर्तपणे ओरडलो. 'वा वा फार छान! ब्रेव्हो राष्ट्रीय कौन्सिल ! नव्या मनुचे स्वागत असो. देशाचे भले इच्छिणारी राजवट चिरायू होवो!!!'

 माझ्या टाळ्यांच्या कडकडाटाने घरातील सारी मंडळी घाबरीघुबरी झाली. पाण्याचे सपकारे मारून मला जागे करू लागली. मी जागा झालो, फार हळहळलो. इतके सुंदर चित्र मी बघितले ते खोटेच असावे ना? अरेरे काय हे दुर्दैव!

 पण मित्रांनो, सुज्ञ मित्रांनो, हसण्यावरी नेऊ नका. मागचे दोन्ही 'अनुभव' मी तुम्हाला सांगितले. मी काही द्रष्टा नाही. पण काही अतिंद्रीय शक्ती, भविष्याचा वेध घेणारी अतिमानवी बुद्धी, सुप्त रूपाने माझ्या देहात वावरत आहे. माझी मनोदेवता मला सांगतेय की इजा, बिजा नि तिजा नक्की होणार आहे. दोन वेळेला दिसले तसे तिसऱ्या वेळी निश्चित घडणार आहे. प्रतीक्षा करा. येणाऱ्या क्रांतीला सामोरे जाण्यासाठी उत्तिष्ठ! (सावधान! सावधान!!)

सावधान! सावधान !! सावधान !!! / ६०