पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानाने आम्ही बरे, मग रेव्हेन्यूवाल्यांनी कस्टम एक्साईजकडे बघून आपली पाठ थोपटून घ्यायची आणि या देशातील सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या खात्याकडे न्याय मिळेल म्हणून अपेक्षेने जायचे त्या न्याय खात्याचाच तराजू आता डगमगायला लागलाय!

 या साऱ्या परिस्थितीचा सम्यक परिणाम माणसावर म्हणजे पर्यायाने साऱ्या समाजावर झालेला आहे. सत्प्रवृत्त बुद्धीवादी समाज, गुंडशाही आणि झुंडशाहीविरूद्ध, त्यांच्या पातळीला जाऊन लढता येत नाही म्हणून उदासीन झालाय. सर्वसामान्य माणूस चंगळवादी बनलाय. त्यामुळे देशाच्या भवितव्याविषयीच्या संवेदना पूर्णपणे घालवून निर्लज्ज, कोडगा आणि मुर्दाड बनत चाललाय. दिवसाढवळ्या माय-बहिणी, छोट्या छोट्या शाळकरी मुली यांच्यावर होणाऱ्या पाशवी बलात्कारांच्या घटना त्याला अस्वस्थ करत नाहीत.

 वैयक्तिक सुखदुःखांच्या हानीपोटी आम्ही चिडून उठत नाही मग राष्ट्राच्या इभ्रतीचा कसला कपाळ विचार करणार? आपल्या देशाचा सर्वोच्च मानबिंदू असा आ प्रिय तिरंगा भर चौकात राष्ट्रद्रोही मंडळी जाळतात, पायदळी तुडवतात तरी आ पेटून उठत नाही. मग ऑलिंपिकसारख्या जागतिक स्पर्धेत आपला ९६ कोटींचा प्रचंड देश आपल्या एखाद्या जिल्ह्याएवढ्या असलेल्या छोट्या राष्ट्रापेक्षा कमी दर्जाचा ठरतो म्हणून थोडेच व्यथित होणार? कधी तरी या देशातील लोक चिडून उठतील, प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बॅस्टिलचा तुरुंग फोडणाऱ्या फ्रेंच लोकांसारखे सर्वंकष क्रांतीला उद्युक्त होतील, अशा अपेक्षा व्यर्थ. कोणत्याहि प्रकारच्या त्यागाची आणि बलिदानाची समाजाची मानसिक तयारीच नाही.

 तेव्हा कोणत्या परिस्थितीत मी या देशाची सूत्रे हातात घेत आहे हे कळावे म्हणून विस्ताराने सांगितले. आपला देश पूर्णपणे विकण्याच्या राजकारणी मंडळींच्या योजनांचा गुप्त अहवाल हाती पडल्यामुळे, तातडीने काही कठोर कार्यवाही करावी लागली, त्याचा तपशील आता उघड करता येत नाही. लष्करी सत्तेच्या पाठिंब्यावर या देशातील नि:स्पृह, बुद्धीवान, देशप्रेमी अशा सर्व क्षेत्रातील अभ्यास मंडळींचे एक राष्ट्रीय कौन्सिल आम्ही बनविलेले असून त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसारच देशाचा कारभार हाकला जाईल. ही क्रांती नव्हे, मी या देशाचा सर्वसत्ताधीश नाही तर केवळ या राष्ट्रीय कौन्सिलचा निमंत्रक व संयोजक आहे. उद्या सकाळी तुम्ही सूर्याची पहिली किरणे पहाल, त्याच्या आधीच काळ्या यादीतील सर्व गुंड, स्मगलर्स, काळाबाजारवाले तुरूंगाच्या गजाआड असतील. कौन्सिलचे निर्णय धडाधड अंमलात आणण्यात येतील. त्याच्या आड येणाऱ्यांना सरळ लष्कराच्या हवाली करण्यात येईल. सामान्य जनता, कामगार, शेतमजूर वगैरे सर्वांनी कसे वागावयाचे, याची संहिता लवकर उपलब्ध करुन दिली जाईल. आम्ही काय करणार

निखळलेलं मोरपीस / ५९