पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थेमधील कोणाही उच्चपदस्थासाठी अश्रू गाळण्याचे कारण नाही. माझ्या या कृतीला लष्कराच्या तिन्ही दलांचा संपूर्ण पाठिंबा आहे. एक अत्यावश्यक कर्तव्य म्हणून अत्यंत नाईलाजाने देशाचा कारभार ताब्यात घेणं मला क्रमप्राप्तच झाले आहे. मात्र कोणत्या परिस्थितीत सत्ताग्रहणास मी उद्युक्त झालो, हे तुम्ही समजून घेणे आणि त्याप्रमाणे सहकार्य करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

 आपल्या वाड-वडिलांनी आत्यंतिक हालअपेष्टा भोगून स्वप्राणांची आहुती देऊन आपला देश परकीय दास्यातून मुक्त केला. त्याची आता आपण बेगडी सुवर्णजयंती साजरी करतोय. आपण सर्वजण अशा समजुतीत होतो की, स्वातंत्र्यातील आपले दिवस सुखासमाधानात जातील. पण या देशातील नतद्रष्ट राजकारणी मंडळींनी आपली किती घोर फसवणूक केली ते आता आपल्या पूर्णपणे लक्षात आलंय. अमुक एका पक्षाचे लोक फसवतात आणि अमुक एका पक्षाचे लोक प्रामाणिक आहेत, असं बिलकूल नाही. प्रमाण थोडे कमी जास्त असेल इतकेच. या सर्वांनाच पक्षीय स्वार्थ आणि त्यापेक्षाहि अधिक म्हणजे वैयक्तिक स्वार्थाने अधिक पछाडलेले आहे. हिंदुस्थान देश ही एक अलीबाबाची गुहा आहे आणि त्यातील सोने-नाणे, जडजवाहर दुसरा कोणी सत्तेवर यायच्या आत फस्त केले पाहिजे, अशीच या सर्वांची समजूत झालेली दिसते. या आत्यंतिक स्वार्थापोटी या सर्वांनी राजकारण आणि केवळ राजकारणच केले. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ति जर यापासून दूर राहू शकत नसेल, तर इतर पामरांची काय कथा? या नीच कामासाठी त्यांनी गुंड आणि बुवाबाजी करणारे स्वामी यांना जवळ केले. स्मगलर्सच्या गळ्यात गळे घातले. काळाबाजारवाले ह्यांच्या पंक्तीला राजरोस जेवू लागले! समांतर अर्थव्यवस्थेचा प्रचंड काळा पैसा या राजकारण्यांनीच निर्माण केला; वर दांभिकपणे आम्ही काळ्या पैशाविरूद्ध लढू म्हणून ही मंडळी सांगत राहिली; आणि सारी जनता भोळसटपणे, बावळटपणे ऐकत राहिली. त्यामुळेच भ्रष्टाचार फोफावला. इतका आता तो हाडीमांसी खिळला आहे की, कॅन्सरसारखे सारे शरीरच त्याने पोखरून काढले आहे. कॅन्सर कालांतराने शरीरभर पसरून रोग्याच्या जीवालाच धोका निर्माण करतो, तसा ह्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने साऱ्या देशाचा अंतच जवळ आणला आहे.

 आज देशाच्या कारभारात असा एकही विभाग नाही, की जो या भ्रष्टाचारापासून मुक्त आहे. कोणतेहि आणि कितीही क्षुल्लक काम सरकार दरबारी असेल, तर ते 'वजन' ठेवल्याशिवाय होतच नाही, हा प्रत्येकाचाच अनुभव आहे. ह्याला पायबंद दूरच, उलट कोणत्या खात्यात किती भ्रष्टाचार आहे, याची तौलनिक आकडेवारीच वाचायला मिळते. मग पोलीस खात्याने स्वत:ची समजूत घालायची की, इन्कम टॅक्सवाल्यांच्या तुलनेत आपल्याकडे भ्रष्टाचार कमी, इन्कम टॅक्सवाल्यांनी म्हणायचं की, रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या

सावधान! सावधान !! सावधान !!! / ५८