पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडला होता. तेथे इतर कोणी कसा विश्वास ठेवायचा ? भूकंपाच्या वेळी नाही तरी निदान पानशेतच्या दुर्घटनेच्या वेळी मी अनेकांचे प्राण वाचवू शकलो असतो ? अर्थात कुणी विश्वास ठेवला असता तर!.........

 आताही माझ्या मनाला मागच्या दोन्ही वेळेसारखेच अस्वस्थ वाटतंय. एक फरक मात्र नक्की जाणवतोय. मागच्यासारखे कांही तरी अशुभ घडणार असं मात्र वाटत नाही. पण काय घडणार तेहि कळत नाही. मात्र मघा ओरडत असलेल्या मांजरांचा ओरडा आता वाढलाच आहे. एवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधून कोणी तरी झोपमोड होऊन चिडून उठलं असावं. मांजरांच्या दिशेने दोन-चार दगड फेकलेले ऐकू आले. मांजरं पळाली. पुन्हा सारं शांत झालं. घरात सगळी झोपली होती. ही शांतताच मला असह्य झाली होती. त्यापेक्षा मांजरांच्या ओरडण्याची जरा जाग तरी वाटत होती. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडलो होतो. काहीच सुचत नव्हतं. काय घडणार असेल ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा झाला होता. चारी बाजूंनी कान कानोसा घेत होते......

 असाच काही वेळ गेला. अचानक रेडिओ, टी.व्ही. सुरू झाल्याचा मला भास झाला. एवढ्या मध्यरात्री कसला आवाज ? आणि तोसुद्धा लष्कराच्या बँडच्या आवाजासारखा. अचानक सायरनचा आवाज आला. पोलिसांच्या जीपस् रस्त्यावरून फिरू लागल्या. ध्वनिक्षेपकांवरून घोषणा होत होत्या. 'आपापले रेडिओ-टेलिव्हिजन सेटस् चालू करा, सर्व काही नीट ऐका. रस्त्यावर येऊ नका, गडबड करू नका, रस्त्यावर उतरलात तर निष्कारण गोळी खाऊन मराल. शांतता पाळा. रेडिओ, टी.व्ही. नसणाऱ्या जनतेसाठी थोड्याच वेळात रस्त्यारस्त्यातून निवेदने करूच. एकामागोमाग पोलिसांच्या गाड्या घोषणा करीत जात होत्या. पाठोपाठ लष्कराच्या चिलखती गाड्या फिरू लागल्या, जमावबंदी पुकारली होती. सकाळी आठपर्यंत रस्त्यावर आल्यास गोळी खावी लागेल, असे इशारे वारंवार दिले जात होते.

 आम्ही घरातील सर्वजण जागे झालो. सगळ्या घरांतून लोक दबकत दबकत कुजबूजत होते. पण कुणी मोठ्याने बोलत नव्हते, घराबाहेर पडत नव्हते. टी. व्ही. वर लष्करी संचलने दाखविली जात होती. थोड्याच वेळात निवेदक आला. दूरदर्शनखेरीज बाकी चॅनेल्स बंद होती. मुख्य निवेदन हिंदीमध्ये होते. पाठोपाठ सर्व भाषांमध्ये त्यांची भाषांतरे प्रसृत होणार होती. लष्करी गणवेषातील निवेदकाने घनगंभीर आवाजात छापील निवेदन वाचावयास सुरुवात केली. 'भारताच्या नव्या राष्ट्रप्रमुखांचे निवेदन जसेच्या तसे मी वाचून दाखवत आहे.'....

 ‘भारताच्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनो, काही वेळापूर्वीच मी एक प्रमुख राष्ट्रसेवक या नात्याने जुनी व्यवस्था मोडून काढून या देशाची सत्ता हातात घेतली आहे. पूर्वीच्या

निखळलेलं मोरपीस / ५७