पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८. सावधान! सावधान !! सावधान !!!


 रात्रीचे दोन अडीच वाजले असतील. कुठं तरी मांजरं विचित्र स्वरात रडत होती का ओरडून एकमेकांशी भांडत होती ते कळत नव्हतं. पण साऱ्या शांत, निःशब्द वातावरणात त्यांचा आवाज अत्यंत बेसूर वाटत होता. मी मनोमन हबकलो होतो. काही तरी विलक्षण घडणार होतं, नक्की मला चांगलं आठवतंय. अशाच एका भयाण मध्यरात्री मी दचकून उठलो होतो. जागच्या जागीच अंथरूणावर अस्वस्थपणे बसलो होतो. कोणाला तरी उठवावं आणि काही तरी घडणार आहे हे सांगावं असं मला फार वाटत होतं. पण एकतर मी सांगेन त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. कदाचित वेड्यातच काढलं असतं म्हणून मी गप्प राहिलो....

 मला मात्र ती रात्र एकसारखी आठवत होती. त्या रात्री असंच अस्वस्थ वाटत होतं. भीतीची भूतं भेडसावीत होती. क्षणाक्षणाला मनाची अस्वस्थता, तगमग वाढत होती.... अचानक 'ती' वेळ आली! सगळीकडे एकच आरडाओरडा झाला. मोठमोठ्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. सारी बिल्डिंगच्या बिल्डिंग एखाद्या महाकाय राक्षसाने लीलया गदागदा फिरवावी तशी हालत होती. लाईट गेले तरी त्या अंधारातहि समोरच्या इमारती वाकड्या-तिकड्या होताना, उन्मळून पडताना दिसत होत्या. बॉम्बस्फोट व्हावा तसे मोठमोठे धडाडधूम आवाज, लोकांच्या किंकाळ्या, मनाचा थरकाप उडवीत होत्या. अंदाजाने आम्ही चाळीच्या जिन्याच्या दिशेने धावलो, तो काय जिनाच जागेवर नव्हता! गच्चीच्या कठड्यांना कसंबसं धरून आम्ही जीव वाचवत होतो.....

 अनेक वर्षांपूर्वीची ती भूकंपाची दुर्घटना जशीच्या तशी मला डोळ्यांसमोर दिसत होती!

 त्या भूकंपाच्या प्रसंगी मला 'सूचना' मिळाली ती आयत्या वेळी, अगदी आयत्यावेळी. पण त्या आधीच्या पानशेत धरणाच्या दुर्घटनेच्या वेळी तर दोन दिवस आधीच्या मध्यरात्री मला घराघरातून वाहात जाणारे पाण्याचे लोंढेच्या लोंढे दिसत होते! रस्त्यारस्त्यातून धोंऽधों वाहणारे पाणी, त्यातून वाहत जाणारी माणसं, जनावरं दिसूनसुद्धा मी मूर्खासारखा स्वस्थ बसलो होतो. भविष्यातील घटनांचा वेध घेणारी काही 'अतिमानवी शक्ती खरोखरच माझ्या ठिकाणी आहे का? माझाच मला संभ्रम

सावधान ! सावधान !! सावधान !!! / ५६