पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवसात एक दिवस आमच्याकडे पाठक गुरुजी आले होते. मनोहरची पत्रिकाच आम्ही केली नव्हती म्हणून जन्मवेळ वगैरे सांगून त्यांचेकडून त्याची पत्रिका करून घेतली आणि तीच आमच्या सुखी आयुष्यांतील कदाचित घोडचूकच ठरली. पाठक गुरुजींनी सचिंत चेहऱ्याने पत्रिका दिली. पण म्हणाले, "रघुकाका, एक अत्यंत वाईट गोष्ट तुमच्या कानावर घालायचं माझ्या जीवावर येतंय. मनोहरच्या पत्रिकेत मृत्युषडाष्टक आहे. त्याला अल्पवयीन म्हणजे तीस वर्षाच्या आंतच मृत्युयोग आहे.” आमच्या दोघांच्या मनावर हा वज्राघातच होता. आम्ही पाठक गुरुजींचे निदान चुकीचं असावं अशा भाबड्या कल्पनेने आणखी दोघा-तिघां दूरदूरच्या ज्योतिषांना पुन्हां पत्रिका दाखवली; पण भविष्यवाणी तीच होती. एक दोघांनी तर त्याचे लग्न केल्यास मृत्यू आणखीन आधीच होईल असे सांगितले. त्या दिवसात मनोहर पुण्याला मावशीकडे गेला होता म्हणून बरे. सुधा वेडीच व्हायची पण मी तिला सावरले. जे होणार ते टळत नाही. आपण मनोहरच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत वाट पाहूं. काही अनिष्ट नाहीच घडले तर ज्योतिषशास्त्र एक थोतांड आहे असे समजून आनंदोत्सव करू. पण तोवर त्याला यत्किचिंतहि कल्पना न देतां त्याला जास्तीत जास्त आनंद मिळवून देऊ. असं समजावल्यावर मात्र सुधाला कधी पुन्हा काही सांगावं लागले नाही. काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कलकत्ता- दार्जिलिंगपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत जमतील त्या सर्व ट्रीपस् आम्ही केल्या. त्याला जास्तीतजास्त ह्या इहलोकीचे सौख्य लाभावे म्हणून आणखी कांही गोष्टी त्याच्यासाठी आम्ही केल्या. ज्याचा उच्चार आम्ही कधीहि करणार नाही. फक्त लग्नाच्या बाबतीत मात्र कठोर राहिलो. विषाची परीक्षा आम्हाला बघायची नव्हती आणि दुसऱ्या घरांतील एखाद्या मुलीचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते. जाणूनबुजून कोणा तरुण मुलीला वैधव्याच्या खाईत आम्ही कसे लोटू? तुमच्या मालूला नकार कळविताना आमच्या मनावर कोणते आभाळ कोसळले असेल? पोटातले आसू लपवून चेहऱ्यावर उसने हास्य आणताना आम्हाला किती वेदनांच्या कळा सोसाव्या लागल्या असतील! पण परमेश्वरानेच सारे संपविले. असो.

 हे पत्र मी तुला काही खास कारणासाठी लिहित आहे, तुमच्या नक्षत्रासारख्या गोड मालूला सून म्हणून करून घेण्याचे आमच्या नशिबात नव्हते. सुधाचा त्या अनाथ मुलीवर मनोमन फार जीव जडला आहे. तिचे कन्यादान करण्याची आम्हा दोघांची इच्छा आहे. मनोहरला, तुझ्या मित्राला ती मनापासून आवडली होती. तू आता आम्हाल मनोहरसारखाच आहेस. तेव्हां आम्हा दोघांच्या इच्छेला मान देऊन तूच त्या मालूला पदरात घे आणि तुला कन्यादान करण्याचे पुण्य आम्हांला मिळू दे आणि कै. लक्ष्मणरावांच्या माघारी तळहातावरील फोडाप्रमाणे तुझे जतन करणाऱ्या तुझ्या आईला सून आणि कन्या एकाचवेळी मिळण्याचे सुख लाभू दे. आपल्या भारतमातेची सेवा तू खूप

आगळे कन्यादान / ५४