पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. सोमवारी मनोहर नेहमीप्रमाणे कामाला गेला. बसल्याजागीच तो अचानक बेशुद्ध झाला. नाकातोंडातून रक्त यायला लागलं. सगळ्यांनी घाई करून टॅक्सीने त्याला के. ई. एम्. मध्ये पोचविला. पण कांही उपयोग झाला नाही. ब्रेनहेमरेजने त्याचे निधन झाले. सारेजण चुटपुटले, हळहळले. इतक्या लवकर जगाचा निरोप घेण्याचं वय कां होतं त्याचं ? ईश्वरेच्छा बळीयसी हेच खरं.

∗∗∗


 मनोहरच्या अकाली निधनाला आता पंधरा दिवस होऊन गेले होते. एक दिवस रात्री ऊशीरा मी मिटींगवरुन परत आलो. जेवण झाल्यावर आई माझ्या खोलीत आली. किंचित दार लोटून घेतले. आणि ती ढसाढसा रडू लागली. मनोहरवर तिचा खूप जीव होता, त्या रविवारी मी न गेल्यामुळे मनोहर बिचारा भांबावून गेला. निराश झाला, त्याचाच मन:स्ताप त्याच्या मेंदूला झाला अशीच तिची भाबडी समजूत होऊन बसली होती. खरं म्हणजे मला पण थोडंस अपराधी वाटत होतं. मनोहरने खरोखरच माझी रविवारी वाट बघितली असेल का? घरी 'त्याबद्दल' तो कांही बोलला असेल का? रघुकाकांचं आणि त्याचं काही भांडण तर झालं असेल का? त्या भांडणाचा तर त्याच्या मनावर ताण पडला नसेल? अनेक शंकांच्या इंगळ्या माझ्याहि मनाला डंख करीत होत्या. आईने डोळे पुसले, पदराने चेहरा सारखा करीत म्हणाली.

 "आपण उगाच सुधाकाकूंना आणि रघुकाकांना बोल लावत होतो. मनोहरच्या लग्नात ते जाणून बुजून खो घालत होते. त्यांचंच बरोबर होते."

 "काय म्हणतेस काय आई ? सख्खे आईबाप असं कसं करतील?"

 "हे पत्र वाच. तुझ्याच नांवाने खाजगी म्हणून आलंय. अर्थात तुझं खाजगी कधी नसतंच. म्हणून मी वाचलं."

 मी वाचायला घेतलं.

चि. दिनेश,

 माझं पत्र पाहून तुला खूप आश्चर्य वाटेल नाही? पण गेली दहा वर्षे पोटात ठेवलेल्या दुःखाला प्रथमच मी वाचा फोडत आहे. त्याचे कारण मी शेवटी दिलं आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. तुझा मनोहर नुकताच बी. ए. होऊन नोकरीला लागला होता. त्याची आई घरी सून आणायची म्हणून उत्सुक होती. आमचा एकुलता एक मुलगा म्हणून मनोहर किती लाडात वाढला होता ह्याची तुला कल्पना आहेच. अशा

निखळलेलं मोरपीस / ५३