पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मन्या, लेका लग्न करायचं नां?"

 "हो, करायचं तर!"

 "मग मालूला नापसंत करण्यासारखं काय आहे? त्यादिवशी तर लेका हुरळून गेला होतास. मग कुठे माशी शिंकली?"

 "काका म्हणाले..."

 “मन्या, लग्न तुझं व्हायचंय कां काकांचं? आता या खेपेला मी गप्प बसणार नाही आणि तुला बसू देणार नाही. इतकी देखणी आणि सालस मुलगी पुन्हा मिळायची नाही. आईची खास पारख आहे तुझ्यासाठी. हे बघ, आतां तू ठाम रहा. मी परवाचे दिवशी म्हणजे रविवारी आईला घेऊन येतोय. बरोबर नानाकाकांना पण आणतो. त्यांचं जरा ऐकतील रघुकाका. तू मात्र अजिबात माघार घ्यायची नाहीस. करीन तर याच मुलीशी लग्न, नाहीतर मला लग्नच नको असाच पवित्रा घ्यायचास."

 “बरं." मन्या म्हणाला. मन्याचा चेहरा उत्तेजित बघून मला पण आनंद झाला. रविवारी नक्की येतो असं त्याच्या खांद्यावर थोपटून मी त्याला सांगितलं आणि मी घरी आलो.

 घरी आल्यावर मी आईला सगळं समजावून सांगितलं. मी घेतलेल्या पुढाकाराने ती पण खूष झाली. मालूची जोखीम तिनं उचलली होती. ती मार्गाला लागतेय हे बघून आईला आता निश्चिंत वाटत होतं. अगदी रघुकाका-सुधाकाकूंनी विरोध केला तर वेळप्रसंगी आपल्याच घरातील एक खोली मनोहरला द्यायची व मालूचा आणि त्याचा संसार थाटून द्यायचा असं आम्ही ठरवलं होतं.

 मधला शुक्रवार गेला. शनिवार संपला. रविवार उजाडला. पण तो रविवार मनोहरसाठी नव्हता. मला अचानक संघटनेच्या कामासाठी नागपूरला निघावं लागलं. जो जाणारा सहकारी होता त्याला अचानक दुसरीकडे जाण्याचा आदेश आल्याने मला नागपूरला जाणं भाग होतं. आई म्हणालीच.

 "या पोराचं बाशिंगबळच कमी दिसतंय."

 "छेग, असं कांही नसतं, आपल्याच मनाच्या समजूती असतात एकेक. तीनचार दिवसात येतोच. मग मार्गी लागेल सगळं."

∗∗∗


 पण मी यायच्या आधीच मनोहर मार्गी लागला होता! ऐकलं ते सगळंच भयानक

आगळे कन्यादान / ५२