पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठे टपोरे डोळे आणि अपुऱ्या वस्त्रातून दिसणारा तिचा सुडौल बांधा. क्षणभर ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय डळमळतोय की काय अशी शंका वाटण्याइतकी ती देखणी आणि आकर्षक होती.

 "तुला आवडली ?" आईने विचारले तेव्हां भानावर आलो. पण क्षणात स्वत:ला सांवरलं.

 "आई, तुला माहीत आहे..." माझा स्वर करडा लागल्यावर आईने घाईघाईने बोलायला सुरूवात केली.

 "ही मला सून मिळण्याइतकी मी कुठं भाग्यवान आहे? पण मनोहरसाठी आपण हिला मुंबईला नेऊं या कां? एक गरिबी सोडली तर लाख मुलगी आहे."

 मला ही कल्पना आवडली. मी म्हटलं.

 "चांगलं होईल मनोहरशी जमलं तर. तूं मामांना विचारून तर ठेव."

 मामांचा प्रश्नच नव्हता. एवढ्या पसाऱ्यातून एक माणूस गेलं काय नि आलं काय? मालू आमच्याबरोबर मुंबईला आली. आमच्या घरात पटकन रूळून गेली. आल्या दिवसापासून आईच्या हाताखाली ग्राहक मंडळात काम करू लागली. आईने मनोहरच्या पत्रिकेला जुळेल अशी तिची पत्रिका 'बनवून' आणली. आणि मगच मनोहरसाठी रघुकाकांच्याकडे पाठविली. लगोलगच्याच रविवारी पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी आईने मुद्दाम सत्यनारायणाचा बेत काढून रघुकाका, सुधाकाकू आणि मनोहरला दिवसभर ठेवून घेतलं. दिवसभर मालूचं वावरणं, तिची कामातील तडफ, विनम्र स्वभाव ह्यामुळे सर्वजण तिच्यावर खूष दिसत होते. मधून मधून आईची साखरपेरणी होतीच. मनोहर रघुकाकांचा एकुलता एकच मुलगा असल्याने पैशाची अपेक्षा नव्हतीच. त्यामुळे मालू पसंत पडणारच अशी आईची शंभर टक्के खात्रीच होती.

∗∗∗


 पण अखेर झालं ते उलटच. रघुकाकांचं नकाराचं पत्र आलं तेव्हां मी हतबुद्धच झालो. नकाराचं कारणहि पत्रात नव्हतं. आई वैतागली.

 "या माणसाना म्हणायचं तरी काय? रघुकाका एरवी या पोराचे किती लाड करतात. या लग्नाच्या बाबतीतच एवढे कठोर आणि कोरडे कां होतात तेच कळत नाही."

 "पण आई, या खेपेला मी गप्प बसणार नाही. असं किती दिवस चालायचं." दुसरे दिवशी मी मन्याला ऑफिसातच गाठला.

निखळलेलं मोरपीस / ५१