पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाबतीत अगदी आक्रमक स्वभावाचे आणि मनोहर मात्र अगदीच त्यांच्या तुलनेत शामळू. थोडासा आईसारखा म्हणजे सुधाकाकूंसारखा. त्यामुळेच रघुकाकांनी काही खोड काढली की हा गप्प. रघुकाकांच्या ओळखीनंच एका खाजगी कंपनीत स्टोअरकीपर म्हणून चिकटला. मी संघटनेच्या कामाला वाहून घेतल्यावर रात्रंदिवस त्यातच गुरफटून गेलो. त्यामुळे अलीकडे आमच्या गाठीभेटी कमीच होत. नंतर रघुकाकांना वरळीला ऑफिस क्वॉर्टर्स मिळाल्यावर तर कधी-मधी भेट होई ती पण बंद झाली. पण तोवर मात्र मनोहरचं आमच्या घरात भलतंच प्रस्थ होतं. माझे इतर सर्व मित्र माझ्यासारखेच चळवळे, म्हणून आईला मनोहर फार प्रिय असे. सुधाकाकूंचं आणि आईचं पण कांही तरी लांबचं नातं होतं. त्यामुळे घरोबा होता. आमच्याजवळ त्यांचं बिऱ्हाड होतं तोपर्यंत घरात कांही गोडधोड झालं की त्यात मनोहरचा हक्काचा वाटा असे. मी संघटनेच्या कामासाठी आजन्म वाहून घ्यायचं ठरवलं तेव्हा आईने खूप आकांडतांडव केलं. माझा निश्चय अगदी ठाम स्वरूपाचा आहे हे बघितल्यावर मात्र तिनं माझ्या लग्नाच्या खटपटी कमी केल्या. आणि मग माझ्या एकेक मित्रांच्या मागे लागली. फावल्या वेळेत ती एक वधूवर सूचक मंडळ चालवीत असे. त्यामुळे स्थळांना तोटा नव्हता. मनोहरला तिनं किती स्थळं आणली असतील. पण दाखविण्याच्या कार्यक्रमापर्यंत गाडी यायचीच नाही. रघुकाका फार चिकित्सा करीत. रेसच्या शौकिनाने घोड्याच्या कुळाची, जातीची वगैरे चौकशी करावी तशी पत्रिकेची खोदून खोदून छाननी करत. मग गण जमत नाहीय, पत्रिका जुळत नाही असं सुरू होई. आणि समजा या 'अडथळा शर्यतीतून' एखादी मुलगी दाखविण्यापर्यंत वेळ आलीच तर मग त्यांचं आणि सुधाकाकूंचं मुलगी गोरीच नाही, केसच लांडे वाटतात, मुलगी शिष्ट वाटते असं कांही तरी सुरू होई. एवंच काय मनोहरच्या लग्नाचं घोडं पेंड खात राही. आमची आई एवढी खनपटीस बसणारी. ती पण अखेर कंटाळली. मनोहरच्या लग्नाचा विषय तिच्या मनात पुन्हा उफाळून आला तो मालूला बघितल्यावर.

 त्याचं असं झालं.

 कुठल्या तरी कार्यासाठी मी आईला घेऊन कोकणात देवळ्याला गेलो होतो. तेथे मामाच्या घरी ही मालू तिला दिसली. आई-बाप लहानपणीच गेले असल्याने ती अनाथ मुलगी आमच्या मामांच्या मोठ्या परिवारात आश्रयाला होती. साध्या धुवट पातळांतून सुद्धा तिचे देखणे रुप कुणाचंहि लक्ष वेधून घेई. मामांच्या घरच्या एवढ्या गडबडीतूनसुद्धा आईने मला हळूच परसदारी नेलं. आणि म्हणाली,

 "ती मुलगी बघितलीस ?"

 "कोणती?"

 मालू त्यावेळी विहिरीजवळच्या डोणावर कपडे पिळत होती. स्वच्छ गोरा वर्ण,

आगळे कन्यादान / ५०