पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७. आगळे कन्यादान


 " अरे दिनेश, कळलं का त्या रघुकाकांचं पत्र आलंय् ते."

 "नाही बुवा. काय म्हणतात?”

 "मालू पसंत नाही म्हणे."

 "काय म्हणतेस काय आई ? अगं मालूला बघून गेले त्यादिवशी मनोहरचा चेहरा काय फुलून गेला होता. मी त्याच्याबरोबर स्टेशनपर्यंत गेलो तर हळूच म्हणाला देखील.”

 "काय म्हणाला ?"

 "मुलगी पसंत आहे म्हणाला! आतापर्यंत बघितलेल्या सर्व मुलीत ही नक्कीच उजवी आहे असं म्हणत होता. मग आतां कुठं माशी शिंकली?"

 "मी सांगते हा सगळा रघुकाकांचा कारभार असणार! किती मुली बघितल्या आजवर. माझ्याच माहितीतल्या दहा-बारा असतील."

 "काय अपेक्षा आहेत या रघुकाकांच्या आणि सुधाकाकूंच्या तेच कळत नाही?”

 "आणि आई, तसं बघायला गेलं तर हा मनोहर तरी काय लागून गेलाय ? जेमतेम बी.ए. झाला. आणि नोकरी तरी काय साध्या स्टोअर कीपरची. आता देखणा आहे म्हणून काय एवढ्या उड्या मारायच्या?"

 "मनोहर गरीब आहे रे. हा सगळा रघुकाकांचाच शिष्टपणा आहे. एरवी इतके चांगले आहेत पण या मनोहरच्या लग्नाच्या बाबतीत एवढे तऱ्हेवाईकासारखे कां वागतात तेच कळत नाही. बरं सुधाकाकू पण कांही पुढाकार घेत नाहीत. मुलाची आई म्हणजे सुनेसाठी कशी उतावीळ असते? आता आमच्या नशीबी ते सुख नाही म्हणा......"

 हा शेवटचा टोमणा मला होता. संघटनेच्या कामासाठी जन्मभर अविवाहित राहून मी काम करायचे ठरविले होते. आईच्या इच्छेविरुद्ध. आईचा तो राग असा अधेमधे उफाळून येत असे. मनोहर माझा बालमित्र आणि वर्गमित्र. आता माझ्याच वयाचा म्हणजे तिशी उलटून गेलेली. पहिल्यापासूनच मुळमुळ्या स्वभावाचा, अबोल. स्वत:ला काय हवं वा नको ते कधी ठासून सांगायचं नाही. रघुकाका गॅझेटेड ऑफिसर. प्रत्येक

निखळलेलं मोरपीस / ४९