पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दीपस्तंभासारखी जी प्रतिमा शरदनं रेखाटली होती ती मुळातच अत्यंत भुसभुशीत पायावर डगमगत होती! मला तर टागोरांच्या 'गोरा' कादंबरीची आठवण झाली. शरदला यातले सर्व ‘काही उमगलं किंवा नाही ह्याची मला शंकाच वाटत होती कारण तसा तो सीधासाधा माणूस होता. गुरुजींच्या सुनेनं सरबत आणलं. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. आता बोलणं संपल्यासारखंच होतं. तरीपण एकदा शेवटचा प्रयत्न करावा म्हणून मी कोडगेपणानं शांततेचा भंग करीत म्हणालो,

 “ह्या कादंबरीतील गुरुजींच्या व्यक्तिरेखेमुळे तुम्हा कुटुंबियांच्या भावना प्रक्षोभित झाल्यासारख्या दिसतात. त्यामुळं आता या विषयावर चर्चा होणं इष्ट वाटत नाही. मी एक सुवर्णमध्य सुचवतो. तुम्ही कादंबरी ठेवून घ्या. काही दिवस जाऊ देत. मग शांतपणे आणि त्रयस्थपणे आपण विचार करा आणि जे जे फेरबदल तुम्हाला सुचवावेसे वाटतात ते सुचवा. मी दोन महिन्यानंतर पुन्हा येऊन जाईन. शरद चंदीगडच्या बाजूला असल्याने त्याला जमणार नाही."

 "नको; अजिबात नको. कादंबरीचं हस्तलिखित घेऊन जावं हे बरं. मी हैं मोठ्या दुःखाने सांगते आहे. सासूबाईनी बरंच दु:ख गिळलेलं आहे! आताच कुठं त्या सुखाचे दिवस बघायल्या लागल्या आहेत. त्याला तडा जावा असं आम्हाला वाटत नाही. " सूनबाई बोलत असतानाच गुरुजी उठले; निरोप वगैरे न घेताच आतल्या खोलीतून वरच्या माडीत गेलेले दिसले. त्यांच्या पत्नी पण आत गेल्या.

 सूनबाई खुर्चीवरुन उठल्या. मुलगा उठला. म्हणजे आम्हाला पण ही समारोपाचीच सूचना होती. म्हणून आम्ही दोघेपण उठलो. कादंबरीचं हस्तलिखित शरदच्या हातात देत सूनबाई म्हणाल्या.

 "तुमचा विरस होतोय ह्याची आम्हाला जाणीव आहे. परस्पर न छापता तुम्ही पूर्वसंमती मागण्यासाठी आलात हा तुमचा मोठेपणा. तुमच्या भलेपणाला तशाच चांगुलपणाने साद देता येत नाही हे आमचं दुर्दैव. या घरात सून म्हणून मी पंधरा वर्षांपूर्वी आले. सगळ्याच गोष्टी काही उघडपणे बोलता येत नाहीत. निळसर डोंगर दुरुन चांगले दिसतात, पण जवळ गेल्यावर ते तसे असतातच असं नाही एवढंच मी थोडक्यात सांगू शकते. यातच काय तें समजा."

 शरद आणि मी बाहेर पडलो. मला वाईट वाटत होतं. कुणीकडून तरी प्रसिद्धी मिळवावी म्हणून कोणतीहि तडजोड स्वीकारणारा आमच्यासारखा लेखक तो नव्हता. कादंबरी प्रसिद्ध करता येत नाही ह्याचं त्याला रतिमात्र दुःख होणार नाही जितकं त्याला त्याच्या श्रद्धेला तडा गेल्याचं होणार होतं!

एका कादंबरीची शोकांतिका / ४८