पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योगायोग समजावा अशी तळटीप टाकली तर चालेल का?"

 "छे, छे, मला अशी पळवाट बिलकूल मान्य नाही" शरद त्वेषाने म्हणाला, ‘'कुणीकडून तरी कादंबरी प्रसिद्ध करायची या गोष्टीचं मला अप्रूप नाही. सत्यकथा, अगदी निखळ सत्यकथा म्हणून जशी घडली तशी आणि मूळच्या सर्व व्यक्तिंबरहुकूम कादंबरी वाचकांपुढे जावी यातच मला स्वारस्य आहे. कोणत्याही पळवाटा काढून आणि तडजोडी स्वीकारुन मला मूळच्या सत्यकथनाला गौणत्व आणायचं नाही, हीनत्व प्राप्त करुन द्यायचं नाही."

 शरदच्या तडफदार बोलण्यामुळे शिखरे मंडळी स्तिमित झाली; मी सुद्धा नाही म्हटलं तरी थोडासा चक्रावलोच. गुरुजी असहाय्यपणे मुलाकडे-सुनेकडे बघत होते. मुलगा आणि सून एकमेकांकडे पहात होती. हाच त्यांच्या 'दौर्बल्याचा' क्षण ड या हेतूने मी जोर केला, आणि म्हटलं,

 "गुरुजी, होऊन जाऊ द्या कादंबरी प्रसिद्ध. नातेवाईक काय दोन दिवस बोलतील आणि मग विसरुन जातील. नाही तरी आजकाल कोणाचं कोणाला भलं बघवतं कुठे? मुळीच तुम्ही नातेवाईकांची फिकिर करु नका..." मी माझे बोलणे पुरे करायच्या आतच गुरुजींच्या पत्नी बाहेर आल्या आणि म्हणाल्या,

 "ह्यांचं नाव मुळीच प्रसिद्ध करायचं नाही. आणि ह्यांचं नाव बदललं तरी त्यातील साठेबाईंचे अल्लेख टाळायचे" त्यांच्या बोलण्याने आम्ही चक्रावलोच. गुरुजींची चर्या एकदम म्लान झाली! शरद आणि मी धास्तावून एकमेकांकडे बघायला लागलो. तेव्हा वातावरणातील तणाव कमी व्हावा म्हणून कदाचित् मुलाने संभाषण सुरु केले.

 "हो, महिलांचा आश्रम अप्पांनी काढला तेव्हापासूनच आमच्या नातेवाईक मंडळींनी अप्पांविषयी आणि साठेबाईंविषयी नाही नाही त्या कंड्या पिकवायला सुरुवात केली. कादंबरीत, ‘‘साठे बाई गुरुजींना घेऊन आमच्या घरी आल्या, आम्ही गुरुजींच्या आश्रमात गेलो तेव्हा त्यानी चहा करुन आणला' वगैरे जे उल्लेख आहेत ते संपूर्णपणे टाळायला हवेत. नाहीतर नातेवाईकांच्या हातात उगाचच कोलीत मिळायचं."

 आतापर्यंत गुरुजींचा मुलगा आणि सून ह्यांच्याशी चर्चा चालली होती तोवर ठीक होतं. पण आता प्रत्यक्ष धर्मपत्नीच विरोधात उभी राहिली तेव्हा फारच अवघड होऊन बसलं! ज्या पोटतिडिकेनं त्या बोलल्या त्यावरुन 'मामला' बराच गंभीर दिसत होता. कदाचित पूर्वी गुरुजी आणि त्यांच्या आश्रमातील साहाय्यिका साठेबाई ह्यांच्यावरुन त्यांच्या घरात काही 'महाभारत' पण घडलं असावं! आणि कादंबरी प्रकाशनानंतर त्या जुन्या खपल्या निघून गुरुजींची कुटुंबिय मंडळी रक्तबंबाळ घायाळ होण्याची शक्यता होती. गुरुजींची उच्च प्रतीची, आदर्शवत्, समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या

निखळलेलं मोरपीस / ४७