पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "पण शरदनं गुरुजींच्याविषयी चांगलंच तर लिहिलं आहे. त्यांची इमेज - प्रतिमा ही केवढ्या लोकोत्तर उंचीची आहे हेच तर दाखविलेलं आहे. तुमच्या परिचित मंडळीत आणि नातेवाईकांत त्यामुळे तुमच्या वडिलांचा गौरवच होणार आहे." मी शरदच्या बाजूने उतरलो.

 "आता थोडं स्पष्टच बोलायचं म्हणजे तेच आम्हाला नको आहे. मी त्यांचा मुलगाच असं म्हणतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण परिस्थितीच तशी आहे. आता आणखी परखडपणे सांगायचे तर, खरं म्हणजे मी असं बोलू नये, पण तुम्ही कादंबरी-प्रकाशनाच्या मागेच लागलात म्हणून काही गोष्टी स्पष्टच सांगायला हव्यात.” गुरुजींचा मुलगा तीक्ष्ण नजरेने पहात बोलला. गुरुजींच्या चेहऱ्यावरची चलबिचल माझ्या नजरेतून सुटली नाही.

 "गेल्या इतक्या वर्षांत अप्पांना, तुमच्या भस्माच्या पुड्यांमुळे आणि मंत्रामुळे कोणी पीडित बरा झालाय असं सांगायला एकजणही आला नाही. काय अप्पा, खरं आहे ना?"

 "हो, म्हणजे नाही, म्हणजे तसं खरंच आहे. गेल्या काही वर्षांत आपला हिंदू समाज कमालीचा बदलत चालला आहे. कोणाकडून काही ग्रहण करण्याची कुणाची पात्रताच उरली नाहीय."....

 "ते राहू द्या अप्पा" मुलगा मध्येच त्यांना तोडत बोलला. “त्या भस्माच्या पुड्या आणि मंत्र देणे वगैरे आम्हीच त्यांना बंद करायला लावलं. उगाच लोकांना नादी लावायचं, त्यांच्या आशा पल्लवीत करायच्या आणि मग शिव्याशाप खायचे. त्यापेक्षा हे सारं बंदच करावं असं आम्हीच त्यांना सुचवलं. खरं म्हणजे तुमची हकीगत ही अगदीच अपवादात्मक म्हणावी लागेल. त्याहूनहि स्पष्ट सांगायचं तर तुम्हाला अप्पानी मंत्र द्यायला आणि तुमची छबुमावशी बरी व्हायला गाठ पडायला, मला तरी कावळा बसायला आणि फांदी मोडायला याच म्हणीची आठवण करुन देणारी गोष्ट वाटते. "

 मुलगा इतका परखडपणे बोलत होता म्हणजे घरात बाप-लेकाचे पटत नसावे असाच ग्रह होण्यासारखा होता. आपल्या पित्याचा गौरव होतोय आणि तो त्याच्याच प्रत्यक्ष मुलाला आणि सुनेला बघवत नाही म्हणजे हा मुलगाच वाईट असावा. किंवा नव्या युगातील असल्याने त्याला कदाचित् आपल्या वडिलांचे मंत्र-तंत्राचे, भस्माचे प्रकार पसंत नसावेत! पण इतके होतंय तरी गुरुजी असे गप्प गप्प का? आता काहीतरी तोडगा काढणे भागच आहे असा विचार मनात येऊन मी म्हटले.

 "समजा, शरदनं कादंबरीची नावं बदलली आणि लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून या कादंबरीतील पात्रांशी कोणा हयात व्यक्तिंशी साधर्म्य आढळले तर तो केवळ

एका कादंबरीची शोकांतिका / ४६