पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "हरकत असण्याचं काही कारणच नाही. माझी संमती आहे."

 "मग तुमचा संपूर्ण पत्ता आणि थोडी वैयक्तिक माहिती मला हवी आहे."

 "अवश्य" असे म्हणून गुरुजीनी आपली वैयक्तिक माहिती सांगितली. गेली ३० वर्षे करीत असलेल्या कामाची माहिती सांगितली. त्यांनी माहिती सांगायला सुरवात केली असेल नसेल एवढ्यांत त्यांचा मुलगा आणि सून बाहेर आली. मुलगा बँकेत ऑफिसर होता तर सूनबाई एका स्थनिक कॉलेजात प्राध्यापिका होत्या. त्यानी आमचे सगळे बोलणे ऐकले असावे. कारण मुलाने कादंबरी थोडीशी चाळली आणि म्हणाला,

 "कादंबरीलेखन उत्तमच झालंय. फक्त एक दुरुस्ती मला सुचवायची आहे."

  "ती कोणती?' शरदने थोड्या उत्सुकतेने विचारले.

 "कादंबरीच्या इतर नावांविषयी आमची काही हरकत असण्याचे कारणच नाही, पण आमच्या अप्पांचं नाव मात्र बदलायला हवं."

 "ते काय म्हणून? एक सत्यकथा म्हणून मला तिचं मोल आहे. नाव बदलले की त्या सत्यकथेला गौणत्व येते. माझ्या सर्व मित्रांनी सुचविलं तरी नावं बदलण्याचे मी साफ नाकारलं. आता गुरुजींच्या नावाला विरोध असण्याचे कारणच काय? तुम्ही तर प्रत्यक्ष पुत्र असल्याने तुम्हाला तर आनंद आणि अभिमानच वाटायला हवा.”

 "खरं आहे तुमचं म्हणणं. पण परिस्थिती थोडी वेगळी आहे. अप्पांचं नाव त्यात प्रसिद्ध झालं की अनेकांची पत्रं येतील. कोणी असेच तुमच्या छबुमावशीसारखे पीडि असतील तर ते आशेने आमच्याकडे येतील."

 "मग येऊ देत ना. उलट माझ्या कादंबरी-प्रकाशनामागचा तो तर हेतू आहे. श्रद्धेचा आजकाल लोप होत चाललाय. तेव्हा गुरुजींच्या ठायी श्रद्धा ठेवून, त्यांचा मंत्र कोणी घेतला तर त्यात घेणाऱ्याचे कल्याण होईलच, पण गुरुजींना पण श्रेय"....

 "पण हल्ली अप्पांनी असा मंत्र देणं, भस्माच्या पुड्या देणं बंद केलं आहे." आता गुरुजींच्या सूनबाई शरदचं बोलणं अर्धवट तोडून बोलल्या.

 "पण मघाशी तर गुरुजी अजून आपण मंत्र द्यायला तयार आहोत असं म्हणाले."

 "ते खरं आहे. पण माणूस बघून मी मंत्र देईन. कारण गेल्या वीस-पंचवीस वर्षातला माझा अनुभव काही चांगला नाही." गुरुजी म्हणाले.

 "तेव्हा असं कोणी आमच्याकडे यायला आम्हाला नको आहे; आणि मुख्य म्हणजे येथील परिसरात आणि आमच्या नातेवाईकांत या कादंबरीद्वारे अप्पांचं नाव प्रसिद्ध व्हावं असं आम्हाला वाटत नाही." मुलगा म्हणाला.

निखळलेलं मोरपीस / ४५