पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अपेक्षेप्रमाणे लागलीच शरदचं पत्र आलं. माझ्या काही मुद्यांचं त्याने जोरदार खंडन केले होते. विशेषत: कादंबरीतील पात्रांची मूळ नावे बदलण्याबद्दल. त्याच्या तर्कशुद्ध पत्रोत्तराबद्दल मला त्याचे कौतुक वाटले. माझ्या दोघा-तिघा प्रकाशक मित्रांनाहि कादंबरीचं हस्तलिखित आवडलं. सातत्याने लिहित राहिला तर शरद चांगल्यापैकी लेखक होईल असं सर्वांचे मत झाले. शरद लौकरच येणार होता.

∗∗∗

 त्यानंतर काही दिवसांतच शरद आला. एक-दोन दिवस विश्रांती घेऊन, गप्पागोष्टी करुन आम्ही रविवारी सकाळीच नाशिकला गेलो. शिखरे गुरुजींना आधी कळविले होतेच. त्यांचे घर शोधायला थोडा वेळ लागला. जुन्या नाशकाच्या गल्लीबोळांतून जावे लागले. गुरुजी घरीच होते. बाहेरच्या पडवीत आम्ही बसलो. शरदने नमस्कार केला म्हणून मी पण केला. गुरुजींचे वय साठीच्या आसपास असावं. अंगकाठी मजबूत होती. डोळ्यावरचा थोडासा जाड भिंगाचा चष्मा, डोक्याच्या पुढील बाजूने विरळ होत गेलेले केस सोडल्यास तशी वार्धक्याची खूण नव्हती. प्रथम इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. शरदला नाशिक सोडून बरीच वर्षे झाली होती. मध्यन्तरीच्या काळातील घटना, दादांचा मृत्यू, छबुमावशीचं लग्न, नंतरची तिची 'नॉर्मल वागणूक, त्याची नोकरी, नंतर कादंबरीचं प्रयोजन अशा सर्व गोष्टी शरदनं खुलासेवार सांगितल्या. नंतर तो म्हणाला,

 "गुरुजी, कादंबरीची सर्व कथा तुम्हाला चांगली माहीत आहेच. ज्या क्रमाने घटना घडल्या त्याच क्रमाने मी त्या कादंबरीत आणल्या आहेत. तुमच्याशी संबंधित जो भाग आहे तेवढाच मी तुम्हाला वाचून दाखवतो. काही उणे-अधिक असेल तर अवश्य सांगा.” असे म्हणून शरदने कादंबरी वाचनास सुरुवात केली. शाळा-कॉलेजातून अनेकदां त्यानं नाटकातून कामे केलेली असल्यामुळे, त्याचं वाचन अतिशय प्रभावी आणि परिणामकारक होतं. प्रत्यक्ष वाचल्यापेक्षा त्या कादंबरीचं वाचन ऐकताना ती मला अधिक प्रभावी वाटत होती. गुरुजी तर चांगलेच खूष दिसत होते. आणि त्यांनी तसं असायलाच हवं होतं म्हणा. कारण संपूर्ण कादंबरी त्यांच्याच व्यक्तिमत्वावर पेललेली होती. रुढार्थाने नसले तरी कादंबरीचे धीरोदात्त नायक तेच होते. कादंबरी त्यांना आवडली. मग शरद त्यांना म्हणाला,

 “गुरुजी, ही कादंबरी बऱ्याच जणांना आवडली. सर्वानुमते ती प्रकाशित करावी असं ठरत आहे. मूळ नावं कादंबरीत मी जशीच्या तशी ठेवणार आहे. छबुमावशी, तिचे यजमान वा कादंबरीतील अन्य पात्रांची कोणाचीच हरकत नाही. तुमची पण नसावी अशी माझी कल्पना आहे."

एका कादंबरीची शोकांतिका / ४४