पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसे. कोणी समोर बसवून म्हणवून घेतला तरी तिच्याकडून मंत्राचे उच्चारसुद्धा होत नसत. एवढी कॉलेजात जाणारी मुलगी, पण पाटीवर मंत्र लिहून दाखवला तर तिला वाचता पण येत नसे. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे मग तिच्या हाताला धरून शरदची आई, दादा आणि कधी शरद मंत्राचा जप करु लागले. एक दीड महिन्यांच्या कालावधीत अनेक प्रकार घडले. झिंज्या सोडून "ते बोलावतात, ते बोलावतात' असे म्हणत छबुमावशी रात्री-बेरात्री पळत सुटायची. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीकडे धावायची. गुरुजींच्या मताने हा सगळा सत् आणि असत्चा झगडा होता. तिच्या ठिकाणी असलेली भूतयोनीतील व्यक्ती आणि परमेश्वराचा नामोच्चार ह्यांचा तो झगडा होता. कादंबरीत अनेक प्रसंगांचे सुरेख वर्णन होते. एकेक प्रसंग, विशेषत: अमावस्येच्या रात्रीचे. इतके भयानक की शरदची आई-दादा पार गडबडून जातात. छबुमावशीला तिच्या आई-वडिलांकडे पोचवून मोकळे व्हावे असे अनेकदा त्यांच्या मनात येते. पण एक तर तिचीच बदनामी व्हायची. शिखरे गुरुजींवरील ठाम श्रद्धेमुळे, त्यानी दिलेल्या दिलाशामुळे ते सर्वजण छबुमावशीला नेटाने संभाळतात; आणि एक दिवस अचानक त्यांच्या तपश्चर्येला फळ येते. छबुमावशीच्या मुखातून ते भूत आपला पराभव मान्य करते आणि निघून जाते. मावशीच्या तऱ्हेतऱ्हेच्या लीला आणि सर्वांचे कसोशीचे प्रयत्न, कादंबरीतील सर्व प्रसंग शरदने अगदी प्रत्ययकारी रंगवलेले होते. कादंबरी वाचताना वाचक जागच्या जागी खिळून जावा अशी वातावरण निर्मिती होती. शरदच्या कुटुंबियांची शिखरे गुरुजींवरील श्रद्धा ठायी ठायी दिसत होती.

∗∗∗


 मी नाशिकला चौकशी केली. सुदैवाने शिखरे गुरुजी हयात असून तेथेच असल्याचे समजले. मी शरदला सविस्तर पत्र पाठवलं. कादंबरी अतिशय प्रभावी असल्याचे कळविले. खरोखरच कादंबरी एवढी प्रभावी होती की त्यातील गूढमय वातावरणामुळे वाचकांच्या अंगावर रोमांच अभे राहीले असते. माझी बायको कादंबरी वाचनात गुंग असताना एकदम वाऱ्याच्या धक्क्याने भिंतीवरचे एक कॅलेंडर खाली पडले. तेव्हा ती इतकी घाबरली की भुताटकीचाच हा प्रकार समजून गांगरून गेली. धावत जिना उतरुन अंगणात जाऊन बसली ती मी घरी आल्यावरच वरती घरात आली! हे सुद्धा मी शरदला कळवले. शरद माझा मित्र होताच. पण त्याची कलाकृतीहि दर्जेदार असल्याने मी मनापासून त्याला धन्यवाद दिले. कादंबरीची बलस्थाने आणि कच्चे दुवे दाखवून मला जमेल तसे परीक्षण केले. त्याने लवकरात लवकर यावे आणि शिखरे गुरुजींना भेटावे असेहि त्याला मी सुचविले.

∗∗∗

निखळलेलं मोरपीस / ४३