पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या छबुमावशीचा पुनर्जन्म झाला ते शिखरे गुरुजी आता हयात आहेत किंवा कसे ह्याबद्दल चौकशी करुन कळव. तुझ्या मुंबईपासून नाशिक तसं लांब नाही. आमचे दादा सोडले तर तशी कादंबरीतील सर्व पात्र सुदैवाने हयात आहेत. कादंबरीतील सत्यकथन जसंच्या तसं प्रकाशित करावं अशी माझा इच्छा आहे. छबुमावशीचं लग्न झालं. तिच्या मिस्टरांचा काही विरोध नाही. तेव्हा शिखरे गुरुजींशी तू संपर्क साध."

 "अवश्य."

∗∗∗


 कादंबरी घेऊन मी मुंबईला परतलो. निवांतपणे कादंबरी वाचली. खरोखरच अप्रतिम कादंबरी होती. सराईत लेखकाचा थाट होता. नवशिकेपणाची नामोनिशाणी नव्हती. सर्व पात्रांचं स्वभाव - रेखाटन उत्तम वठलं होतं. कादंबरीतील लेखनावरून भूतपिशाच्चांविषयी शरदने बरीच शास्त्रीय आधारभूत माहिती संकलित केलेली दिसत होती. त्याच्या साधक-बाधकतेविषयी बऱ्याच अधिकारी व्यक्तिंशी चर्चा केली असावी. तो म्हणतो तशी स्फूर्तीच्या एका झटक्यासरशी प्रत्यक्ष लेखन त्यानं केलं असलं तरी विषय त्याच्या डोक्यात बरेच दिवसपर्यंत घोळत असावा. कादंबरीचा 'फॉर्म' पण चांगला निवडला होता. प्रत्येक पात्र आपली हकीगत सांगतंय असं दाखविलं होतं. त्या त्या पात्रांच्या निवेदनांतून कथानक पुढं सरकत होतं. तसं कथानक साधं होतं. छबुमावशी ही शरदच्या आईची सर्वात धाकटी बहीण. ती कॉलेजला शिकत असे. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याहून ती शरदच्या आईकडे राहायला आली. आणि काय झालं देव जाणे! पण दिवसेंदिवस ती खंगायला लागली. एकसारख्या होणाऱ्या उलट्यांनी हैराण झाली. मधूनमधून बेशुद्धावस्थेत असल्यासारखी दिसे. बघता बघता अशी काही विचित्र वागायला लागे की जणू काही ती ह्या "जगातली' नव्हेच. पुढे पुढे तिला वेडाचे झटके आल्यासारखे दिसू लागले. सैरावैरा धावत सुटणं, ग्राम्य शब्दांत बोलणं इतकं ग्राम्य की पाठ करूनसुद्धा असले शब्द घरंदाज स्त्रियांना उच्चारतापण येणार नाहीत. डॉक्टरांनी प्रथम प्रथम उपचार केले. पण त्यांना छ्बुमावशीच्या आजाराचे काहीच निदान होईना. शारीरिकदृष्ट्या कोणताच दोष आढळेना. त्यांनी दिलेली सगळी औषधं उलटून पडायची. हा आजार म्हणजे बाहेरची काहीतरी भूतबाधा आहे असेच सर्वांचे मत होऊ लागले. शरदच्या आईच्या माहितीच्या कोणी साठेबाई म्हणून होत्या. त्यांनी आईला शिखरे गुरुजींचे नाव सांगितले. तेव्हा शरदचे आई-दादा त्यांच्याकडे गेले. शिखरे गुरुजींनी त्याना धीर दिला. त्यांनी काही भस्माच्या पुड्या दिल्या. 'ओम नमो शिवाय' हा मंत्र सांगितला. हा मंत्र देवासमोर बसून छवुमावशीकडून १०८ वेळा रोजच्या रोज म्हणवून घ्यायला सांगितला. सुरवाती सुरवातीला छबुमावशी त्या मंत्राचा उच्चारच करु शकत

एका कादंबरीची शोकांतिका / ४२