पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “सांगतो ना. आमची छबुमावशी तुझ्या लक्षात असेलच. आपण नाशिकला असताना एकदा भूतबाधेनं तिला पछाडलं होतं बघ."

 "हो, हो, आठवतं खरं. मी त्यावेळी प्रत्यक्ष काही बघितलं नाही. पण तू त्यावेळी तिच्या अंथरुणावर, कपड्यांवर पडणाऱ्या बिब्याच्या खुणा, तिचे वेळी-अवेळी धावत सुटणं, ग्राम्य भाषेत शिव्या देणं, याविषयी सगळं सांगायचास ते आठवलं."

 "तेच ते. त्यावेळी त्या शिखरे गुरुजींच्या मंत्रांमुळे आणि भस्माच्या पुड्यांमुळं ती बचावली."

 "हो, हो. तू सांगितलं होतस तसं. पण त्या विषयावर कादंबरी लिहिलीस म्हणजे ग्रेटच आहेस तू. कारण त्यावेळी तू जेमतेम पंधरा-सोळा वर्षाचा असशील?"

 "हो, तसा मी लहान होतो खरा. पण सगळे प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर घडल्याने मनात अगदी खोलवर रुतून बसले होते. आमच्या दादांची आणि आईची बरेचदां शिखरे गुरुजींशी चर्चा व्हायची. ती मी कुतूहलापोटी ऐकत बसायचा. दादा गेले. नंतर आईशी चर्चा केल्यावर त्यातले गूढ अर्थ आता मला समजले. कादंबरी लिहिताना त्याचा मला फार उपयोग झाला."

 "पण एकदम कादंबरी लिहावसं कसं वाटलं? आणि ते सुद्धा आधी कधीच काही लिहिलं नसताना?"

 "ते पण जरा आश्चर्यच म्हणायचं. आमचं साईटवरचं काम चालू होतं. तेव्हा एका बाईला अशीच भूतबाधा झाली होती. अनेक प्रकार केले पण ती काही सुधारली नाही. मी आईला म्हटलं की आपण तिला शिखरे गुरुजीचा मंत्र जपायला सांगू या का? तेव्हा आई म्हणाली की नको उगीच. एक तर त्याच्यासारख्या भस्माच्या पुड्या नाहीत आणि मुख्य म्हणजे "ओम् नमो शिवाय" हा मंत्र ज्याच्याकडून घ्यायचा तो तसाच अधिकारी पुरुष हवा. उगाच आपण काहीतरी बरं करायला जायचं नि आपल्यावरच दोष यायचा. बरं, माणसं पण आपल्या माहितीतील नाहीत. त्यांची अशा गोष्टींवर श्रद्धा आहे नाही हेही आपल्याला माहित नाही. आईचं म्हणणं मला पटलं. मी गप्प बसलो. पण त्या पछाडलेल्या बाईच्या लीला बघून सारखी छबुमावशी आठवायची; आणि मग असा काही झटका आला म्हणतोस की त्या सपाट्यात आठ दिवस बसून लिहितच होतो. झपाटलेलाच होतो म्हणेनास!"

 "बरं आता मी उद्या निघणार आहे. कादंबरी नेऊ म्हणतोस?"

 "हो तर. त्यासाठीच तुला देत आहे. तू वाच, इष्ट वाटलं तर तुझ्या मित्रांना दे. वहिनींना पण वाचू दे. आणि तुझं प्रांजळ मत कळव. मित्र म्हणून भलावण नको. अगदी त्रयस्थ म्हणून मत दे. आणि तुझ्याकडचं मुख्य काम असं की ज्या शिखरे गुरुजीमुळे

निखळलेलं मोरपीस / ४१