पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६. एका कादंबरीची शोकांतिका


 जगात आजकाल विश्वास कशावर ठेवावा तेच कळत नाही. ज्यांच्यावर श्रद्धा म्हणून ठेवावी त्यांच्याविषयी असं काही बरंवाईट कळतं की त्या श्रद्धेचा पार चुराडा होऊन जातो. राजकीय जीवनात श्रद्धायोग्य व्यक्ति मिळणे दुरापास्तच; सामाजिक जीवनात शिक्षक, वेदशास्त्रसंपन्न पंडित, तळमळीचे समाज-सुधारक असे आदरणीय लोक दिसतात. कोणाविषयी नितांत आदर बाळगावा, त्याला श्रद्धास्थानी जपावं, तोच त्या व्यक्तिविषयी अशा काही धक्कादायक गोष्टी कळतात की मन अस्वस्थ होतं. हे सारं आठवलं आमच्या शरदवरुन आणि त्याच्या शिखरे गुरुजींवरुन. शरद आणि मी वर्गमित्र. इंजिनीअर होऊन तो भाक्रा-नान्गलच्या बाजूस नोकरीनिमित्त गेला त्या गोष्टीला आता १५-२० वर्षे होऊन गेली. त्यामुळे नाशिक सोडल्यापासून आमचा संबंध जवळजवळ संपुष्टात आला. जुन्या मैत्रीला अचानक उजाळा मिळाला तो परवाच्या नाताळच्या सुट्टीत. मी बायका-मुलांना घेऊन दिल्ली, हरिद्वार-मसुरीच्या बाजूला फिरायला गेलो होतो. फिरता फिरता चंदीगडला एका हॉटेलपाशी अचानक शरद भेटला. आम्हा दोघांना खूप आनंद झाला. त्याच्या आग्रहामुळे मला माझ्या बेतात बदल करुन त्याच्या साईटवरच्या बंगल्यावर दोन-तीन दिवस मुक्काम करावा लागला. त्याची बायकामुलं खूप लाघवी; त्यांच्या आग्रहामुळे दोन-तीन दिवस मजेत गेले. खूप दिवसांनी मराठी बोलायला मिळालं म्हणून ती सर्वजण खुषीत होती. एक जगप्रसिद्ध धरण, शरदमुळे आम्हाला बारकाईने आणि जाणकारीनं पहायला मिळाले. निघण्याच्या आदल्या रात्री शरदनं माझ्या हातात एक कादंबरीचं बाड ठेवलं आणि म्हणाला,

  "तुझ्या लघुकथा-लेख इकडे येणाऱ्या मासिकांतून, वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. तुला पत्र लिहायचा विचार मनात यायला आणि नेमका त्याच वेळी तू चंदीगडला भेटायला गाठ पडली. म्हणून तर स्वार्थापोटी तुला आग्रह करून आणलं. ही कादंबरी तुला दाखवायची होती."

 "कमाल केलीस. नेहमी लिहितोस का?"

 "नाही रे बाबा, आयुष्यात प्रथमच लिहिलं. खरं म्हणजे तुझ्यासारख्या लेखकाला दाखवायला मला संकोचच वाटायला हवा. पण एकतर तू माझा मित्र आणि कादंबरीचा विषय तुझ्या माहितीचा."

 "माझ्या माहितीचा ? तो कसा काय बुवा?"

एका कादंबरीची शोकांतिका / ४०