पान:निखळलेलं मोरपीस.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर त्यांना केवढी हिंमत आली असती? त्यांच्या बरोबरीने प्रतिकार करताय हे बघितल्यावर त्यांना सिंहाचे बळ आले असते. खाल्ला असतात थोडा मार म्हणून कांही बिघडलं नसतं. तुमच्या सर्वांसाठी तो बापूराव धडपडतोय्. त्यानं एकट्यानं मार खायचा आणि तुम्ही पळपुटेपणा करायचा. कशाला त्याला तुमच्याविषयी प्रेम वाटेल? तो बापूराव तुम्हाला सोडून गेला ते बरोबरच आहे. गांडुळांच्या वस्तीत राहायला त्याच्यासारख्या मर्दाला कसं आवडेल" संभूकाकांचा चेहरा सात्विक संतापाने क्रुद्ध झाला होता. संभूकाका त्या रागापोटी सरळसरळ सर्वांना षंढ म्हणत होते. गांडूळ म्हणत होते. नामर्द म्हणत होते आणि सर्वजण अवाक् होऊन ऐकत होते. त्यांना अडवायचं नैतिक बळ कोणामध्येच नव्हतं

 "तेव्हां बाबांनो, विचार करा" संभूकाका थोडे शांत होऊन बोलूं लागले

 'मी तुमच्या संघटनेमध्ये वावरलोय. म्हणून तुमच्यासारखे बोलू शकतो, तुमच्यामध्ये वावरू शकतो. आम्ही आता म्हातारे झालो. गुंडगिरीला जात नसते. ती कांही आमच्या समाजाची मक्तेदारी नाही. फक्त या गुंडगिरीला आपण किती घाबरायचं, किती भ्यायचं हे आपणच ठरवायचं. सकाळी मैदानावर जाऊन व्यायाम करता, शरीरं तगडी करता तशी मनं तगडी करा. तुमच्या हातात एवढी संघटना असेल, ताकद असेल तर तिचा उपयोग करा. एखादं पथक काढा. बापूरावांवर झाला तसा हल्ला झाला अगर अन्याय झाला तर त्या गुंडाच्या घरी जाऊन त्याला मारून काढा. पहिल्या पहिल्यांदा मार खाल पण तेवढ्याने माघार घेऊ नका. तुम्ही प्रतिकार करताय म्हटल्यावरच मग गुंड मंडळी हबकतील, तुम्ही गुंडगिरीचा पाठपुरावा करताय म्हटल्यावर पोलिसांना पण दाद घ्यावीच लागेल. प्रत्येक वेळी नुसतं त्यांच्यावरच अवलंबून कसं चालेल? आता या गुंडगिरीत आमचा सीत्या आहे, बापूरावांना मारहाण केली ह्याची मला चुटपुट वाटली म्हणून मी आलो. आता करण्यासारखं माझ्या हातात काहीच नाही. ते सीत्याला दिलेले पांच हजार रुपये मी त्याला परत करायला लावणार होतो. पण नाही. तुमच्या भ्याडपणाचा तो दंड आहे. तुमच्यासाठी झटणारा तुमचा मित्र संकटाच्या खाईत असताना त्याला एकाकी टाकून जाण्याचा जो कृतघ्नपणा दाखवलात त्याचा तो दंड आहे. राहवलं नाही मंडळी म्हणून सांगायला आलो. अधिक-उणं कांही बोललो असेन तर माफ करा.'

 सर्व मंडळी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. संभूकाकांसारख्या सीध्या-साध्या माणसाचं साधं सरळ तत्त्वज्ञान ऐकून साठे आणि मंडळींना परमावधीची शरम वाटत होती. निदान त्याक्षणी तरी धरणीमातेनं दुभंगून पोटात घ्यावसं त्यांना वाटत होते!

निखळलेलं मोरपीस / ३९