पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अरे बाबानो, मी सीतारामचा काकाच असं बोलतोय म्हणून तुम्हाला नवल वाटतंय ना? पण माझ्यासारख्यानंच सांगायला हवंय म्हणून मुद्दाम सांगायला आलोय."

 "पण संभूकाका, त्यांच्या हातात काठ्या होत्या, लोखंडी शिगा होत्या, आम्ही निःशस्त्र होतो. आमचं काही चाललं नसतं."

'अरे बाबांनो, हे धर्मयुद्ध थोडंच आहे? मारेकरी म्हटला की तो अवचितच गाठणार आणि आता देवाला स्मरून अगदी मनापासून खरं सांगा तुमच्या हातात काठ्या असत्या तर केला असतात का प्रतिकार? बोला, अगदी खरं बोला.'

 सर्वजण गप्प बसले. हे खरंच होतं.

 'बाबानो, तुम्ही गप्प बसलात ह्यातच सगळं आलं. काठ्या नव्हत्या म्हणून तुम्ही पळालात हे खोटंच. खरं तर मनाची म्हणून जी ताकद लागते ती तुमच्याकडे औषधाइतकी सुद्धा नाही म्हणून तुम्ही पळालात. लांब कशाला? आज सकाळी सीतारामचा निरोप आल्यावर यायचं टाळलत ते याचमुळे. खरं की नाही साठेसाहेब ?'

 ‘होय, खरं आहे काका.' वरमलेल्या सुरात साठ्यांनी एकदम शरणागती दिली.

 ‘तुम्ही सकाळी मैदानावर जाता. तब्येतीने दिसताय तर सगळे दणदणीत. आमच्या फाटक्या सीतारामच्या तुलनेत तर नक्कीच सणसणीत आहात. अंगकाठी मजबूत दिसली तरी तुम्हाला मनाची ताकद नाही. झाडावरून पान पडलं तरी आभाळच कोसळलंय समजून धांवणारी तुम्ही मंडळी. तुमच्याच कुणी पुढाऱ्याने म्हटलंय ना- जरा वाकून चाला असं कोणी दरडावून सांगितलं की तुम्ही सरपटायलाच लागता.’

 'पण काका, ही तर सगळ्यांचीच स्थिती आहे. आम्ही एकटं दुकटं काय करणार?'

 'तेच सांगायला आलोय् बाबांनो. प्रत्येकजण असं म्हणायला लागला, दुसऱ्याकडं बोट दाखवून स्वत:च्या भ्याडपणाचं समर्थन करायला लागला तर तुम्ही मंडळी जाणार तरी कुठं? आणि तुमचं होणार तरी काय? अरे, घाबरत घाबरत दिवस काढायला लागलात तर भाकरीसाठी घराबाहेर पडायची पण तुम्हांला भीती वाटायला लागेल." हे मात्र गोडबोल्यांना मनोमन एकदम पटलं. एकदां लोकलमध्ये त्यांच्या ब्रिजच्या ग्रुपला एका गुंडाने बसायच्या जागेवरून एवढा कांही दम भरला की त्या चौघा ब्रिजवाल्यांनी घाबरुन महिनाभर डबा बदलला. तेवढ्यानेहि भीती गेली नाही तेव्हां दुसऱ्याच लोकलने ऑफिसला जायला लागले!

 " तेव्हा मला काय म्हणायचंय्?" संभूकाका पुढे बोलू लागले. "बाबानो, हे कुठंतरी थांबायला हवं. तुम्ही असा षंढपणा दाखवलात् म्हणून बापूरावांसारख्या उमद्या माणसाला मुकलात. त्या दिवशी जर त्यांच्याबरोबरीने हिंमतीने उभे राहिले असतात

बिनकण्याची माणसं / ३८