पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आम्ही येणारच होतो. पण सकाळची जरा घाईची कामं होती. म्हणून संध्याकाळी येणार होतो.” साठ्यांनी घाईघाईत खुलासा केला. हो, उगाच तेवढ्यावरुन सीतारामचा राग ओढवायला नको. पण तो एकंदरीत आज शांत दिसत होता. नेहमीची मग्रुरी आणि डोळ्यांतील खुनशीपणा औषधालाहि दिसत नव्हता.

 "असूं दे, असूं दे” आतां तो वृद्ध गृहस्थ बोलायला लागला. “मला संभूकाका म्हणतात. मी सीतारामचा काका. मी आता गांवाकडे असतो. माझी सगळी हयात ह्याच भागात गेली. तुम्हा लोकांच्या संघटनांमधून मी अनेक वर्षं कामं केली. आता वय झालं. हरीऽहरीऽ करत 'वरच्या' बोलावण्याची इच्छा करतोय." माणूस चांगला पांढरपेशा दिसत होता. लांब हाताचा पांढरा शुभ्र कुडता, स्वच्छ धोतर, गळ्यांत माळ, कपाळाला गंध, चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव. सीतारामचा काका जाणवतच नव्हता.

 “तुमचे बापूराव आता कोठे आहेत? इकडे अजिबात येत नाहीत?" संभूकाकानी विचारले.

 साठ्यांनी त्यांना थोडक्यात सगळी हकीगत सांगितली. पण सीतारामचा उल्लेख शक्य तितका कमी करत.

 "मला ठाऊक आहे सगळं." मध्येच त्यांना तोडत संभूकाका म्हणाले.

 “फार वाईट झालं. तेच सांगायला मी मुद्दाम आलो. सीताराम तू आता जा. मी ह्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारतो आणि येतो."

 'जी काका.' असे म्हणून सीतारामने काकांना एक दंडवत घातला आणि कोणाकडेही न बघता तो दाराबाहेर पडलासुद्धा. मनोमन सर्वांना हायसं वाटलं. मोठं दडपण दूर झालं. साठ्यांना वाटलं त्याला चहा विचारायला हवा होता. तेवढीच जवळीक.

 "हं बोला मंडळी, तुमच्याशी मुद्दाम बोलावं, चार गप्पा कराव्या म्हणून मी आलोय. आता तुम्हा सर्वांच्या ओळखी करून द्या बघू."

 मग साठ्यांनी स्वत:सकट सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या.

 "तेव्हां बरं का मंडळी, तुम्ही केलंत ते काही बरोबर नाही झालं. त्या बापूरावाला आमचा सीत्या मारत होता तर तुम्ही पळून गेलात. अरे ठाम उभं राह्यचं होतं. जरा दोन हात करायचेत. बोंब मारायची. तुम्ही प्रतिकार करताय म्हटल्यावर सीत्या आणि त्याचे दोस्त गडबडले असते. पळाले असते."

 सर्वजण दिग्मूढच झाले. खरंच सीतारामचा काका असं बोलतोय? खरं की खोटं ? का यात म्हाताऱ्याचा काही कावाबिवा आहे? संभूकाकांना बहुधा हे जाणवलं. कारण तेच पुढे म्हणाले.

निखळलेलं मोरपीस / ३७