पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता एकेकाला बोलावून सरळ 'ठोकायचा' विचार आहे? सरळ पोलिसात वर्दी द्यावी कां? चर्चा करता करता सगळ्यांच्या मेंदूचा भुगा उडाला. साठ्यांचे ब्लड प्रेशर वाढले. कारण प्रत्यक्ष निरोप त्यांनाच होता! अनेकांची अॅसिडिटी वाढली! हा 'बकासूर' एकेकाला बोलावून खाणार की काय? आता बोलावलंय तर लागलीच जावं की जाऊ नये ह्यावर बराच खल झाला. शेवटी लगेच काही जायला नको. पुन्हा निरोप आला तर 'जाणं' आहेच, ह्या निर्णयावर मंडळी आली. आता बापूराव असते तर? प्रत्येकाच्या मनात विचार आला. रविवारची आठवड्याची एकच सुट्टी. बायका-मुलांसमवेत एकत्र बसून जेवावे असा हा एकच दिवस. पण त्या दिवशीचे जेवण कांही कुणाला गोड लागले नाही. साठे दुपारच्या वामकुक्षीसाठी आडवे झाले ते काळजी करतच. दुपार टळून गेली. अजून सीतारामकडून काही हालचाल नव्हती. एखादेवेळी नसेलच 'तसं' काही. आपल्याला घाबरवण्यासाठी कोणीतरी खोटाच निरोप दिला असेल, या शक्यतेचा विचार करताना साठ्यांना जरा बरं वाटलं. हलकं वाटलं. असं असेल तर काय छान होईल? पण ते सुख काही फार काळ टिकले नाही. त्यांचा मुलगा त्यांच्या कानाशी येऊन म्हणाला, {{paragraph break} "बाबा, सीताराम येतोय."

 “आँ?” आपल्या मुलासमोर तरी घाबरल्यासारखे दाखवू नये एवढेहि साठ्यांना सुचले नाही.

 "एकटाच आहे की आणखी बरोबर कोणी आहे?

 ‘फक्त एक म्हातारेसे गृहस्थ बरोबर दिसताहेत.”

 साठ्यांनी बाल्कनीतून फाटकाचा आवाज आल्यावर बघितले. खरोखरच सीताराम बिल्डिंगमध्ये शिरत होता. त्याचेबरोबर कोणीतरी वृद्ध गृहस्थ दिसत होते. गळ्यातील रुद्राक्षांची माळ आणि एकूण पेहराव पाहतां कोणीतरी वारकरी पंथाचे वाटत होते. साठ्यांनी बाकीच्या सभासदांना आपल्या घरी बोलावले. गोडबोले, मोडक आले. आणखी दोघा-तिघांचा येतोय म्हणून निरोप आला. बाकीचे बहुधा घरातच बसले. आपला चेहरा सीतारामच्या 'ओळखीचा' व्हावा ही कल्पनाच त्यांना पसंत दिसत नव्हती.

 ते वृद्ध गृहस्थ आणि सीताराम साठ्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये आले आणि सर्वांना नमस्काराचे हात जोडत खाली कारपेटवरच बसले. कोचावर बसण्याचा साठ्यांनी आग्रह केला पण खालीच 'बरे आहे' म्हटल्यावर बाकीची मंडळी पण खालीच बसली.

 “हं, बोला. काय काम काढलंत्?" साठ्यांनी धीर करून विचारले.

 "आमच्या काकाला तुम्हां मंडळींना भेटायचं व्हतं. म्हातारा हाये म्हणून तुम्हां लोकांना सांगावा धाडला. तुम्ही नाय् आलात् म्हनून काका म्हनला आपूनच जाऊं"

बिनकण्याची माणसं / ३६