पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'मी ' पूर्ववैभव' सोसायटी कायमची सोडत आहे. माझी बदली पुण्याला करून घेण्याच्या खटपटीत आहे. रीतसर कायदेशीर व्यवहार परस्परांच्या सोयीनुसार करूं."

आपला

बापूराव फाटक

 पत्र श्री. साठेना ते पदाधिकारी होते म्हणून आले होते. बापूरावांचा सोसायटी सोडण्याचा निर्णय म्हणजे 'पूर्ववैभव'च्या मंडळींना प्रचंड धक्काच होता. 'पूर्ववैभव' व बापूराव हे एक सर्वमान्य समीकरण होते. या सोसायटीच्या उभारणीसाठी त्यांनी तन-मन-धन वेचलेले होते. आणि 'पूर्ववैभव' भयमुक्त रहावी म्हणून तर अक्षरश: रक्त सांडले होते. त्यांचा सर्वांनाच मोठा आधार वाटे. कोणतेही कठीण प्रसंग येवोत अथवा कोणालाही कसलीही अडचण येवो, बापूराव प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात. आतां बापूराव नाहीत म्हणजे पाठीचा मणकाच गेल्यासारखा. नुसता आधार जाण्याचा प्रश्न नव्हता तर त्यांचे जाणे म्हणजे साऱ्या सोसायटीला एक लांछन होणार होते. आपल्या भेकडपणामुळे असं झालं. आपल्या नाकर्तेपणामुळे बापूराव आपल्याला दुरावले ही जाणीव आयुष्यभर पाठपुरावा करणार होती. सर्वजण सैरभैर झाले. एकमेकांच्या विचारा कांहीजण पुण्याला जाऊन आले. बापूरावांना त्यांनी परोपरीने विनवलं. पण बापूरावांच्या निर्णयात आता काडीचाहि फरक होण्यासारखा नव्हता. त्यांचे मनच उडालेले होते. सर्वजण निराश होऊन पुण्याहून परतले. आपण पहिल्यापासून हिंमत दाखवून बापूरावांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं हे आता प्रत्येकाला मनोमनी पटत होतं. पण आता फार उशीर झाला होता.

∗∗∗

 दिवस नित्याप्रमाणे उगवत होता, मावळत होता. लोकल गाड्या तुडुंब लोक भरून धावत होत्या, रिकाम्या होत होत्या. भाजीपाला घेऊन लोक घरी परतत होते. सर्व जगरहाटी नित्याप्रमाणे चालूच होती. बापूराव नव्हते म्हणून काय झाले? 'पूर्ववैभव'ची दैनंदिनी यथाकाल चालू होती. बापूरावांची अनुपस्थिती हळूहळू पचनी पडायला लागली होती. पण अचानक एक रविवार उजाडला तो साठ्यांच्या पोटात गोळा घेऊनच. सकाळीच सीतारामचा एक माणूस त्यांच्या दाराशी आला आणि सीतारामदादाने बोलावलंय, एवढा सांगावा देऊन गेला! साठेंनी सर्वांना बोलावले. सीताराम ह्या नांवाच्या उच्चारासरशी घाबरायची सर्वाना संवयच लागली होती. त्याप्रमाणे सर्वजण घाबरले. आता काय असेल आणखी ? पैशाची पुन्हा मागणी असेल? का पुन्हा दुकान उभं करायचं असेल? कां

निखळलेलं मोरपीस / ३५