पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घाबरतां म्हटल्यावर पुन्हां पुन्हां तुमचा छळ मांडेल. वारंवार पैशाची मागणी करेल, हे कसं तुमच्या डोक्यांत शिरत नाही? मला, आपल्याच बिल्डिंगमधील माणसाला, आपल्याच कामासाठी धडपडणाऱ्या माणसाला मारहाण झाली. जीवे मारायचा प्रयत्न झाला. त्याचा प्रतिकार करायचा, सूड घ्यायचा कां वर त्या हरामखोर हल्लेखोरालाच दक्षिणा द्यायची? मला स्वत:ला झालेल्या शारिरीक जखमांचे काहीच वाटत नाही. पण तुमच्यासारखी धडधाकट माणसं अशी शेळपटासारखी वागतात त्याचे मानसिक क्लेश अधिक होतात. त्यामुळे सर्व जखमांवर मीठ चोळल्यासारखे होतेय्. असह्य वेदना होतात. तुम्हां सर्वांचा उबग वाटतो. किळस आलीय् तुम्हां सर्वांची."

 बापूरावांच्या एकेका शब्दासरशी सर्वजण हादरत होते. बाहेर बिल्डिंगची इतर मंडळी जमायला लागली होती. सर्वांना बापूरावांचे बोलणं पटत होतं. नाही असं नाही पण त्यापेक्षां सीतारामच्या इंगळीसारख्या लालबुंद डोळ्यांची भीती जास्ती वाटत होती!

 "पोलिसात जावून तक्रार कां नाही गुदरलीत?"

 "पोलिसकडे जाल तर मार खाल अशी सीतारामने धमकी दिली होती."

 "अरे मूर्खानो, रक्त माझं सांडलं. सीतारामचा रोख माझ्यावरच होता ना? मग तुम्ही असे किती दिवस घाबरत बसणार? आपण एकमेकांना सहकार्य करण्यासाठी ना एकत्र येऊन सहकारी सोसायटी स्थापन केली? सीतारामचं दुकान पाडायला माझी मदत हवी वाटली. मग त्याची व्यवस्था लावण्यापूर्वी निदान मला विचारायचे तरी. खुशाल त्याच्या बोडक्यावर पैसे घालून मोकळे झालात?"

 "तुम्हाला एक तर बरं नव्हतं. आणि तुम्ही बरे होईपर्यंत सीताराम आणखी काय काय प्रकार करील ह्याची आम्हांला भीती वाटत होती हे आम्ही कबूल करतो."

 ही वादावादी आणखी किती वेळ चालली असती कोणास ठाऊक? शांताबाई अखेर मध्ये पडल्या. त्यानी बळेबळे बापूरावाना ओढून आपल्या ब्लॉकमध्ये नेले.

 दुसरा दिवस उजाडला. एकंदरीत झाला प्रकार कांही बरा नाही झाला. आपण बापूरावांच्या बाबतीत बरोबर नाही वागलो ह्याची टोंचणी साठ्यांना रात्रभर लागली होती. सकाळी उजाडल्यावर निदान त्यांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी म्हणून जिना उतरुन साठे, बापूरावांच्या दाराशी गेले. पाहातात तो काय? दाराला भले मोठे कुलूप! म्हणजे बापूराव एवढ्या पहाटे गेले कुठे? आजूबाजूला कोणालाच माहिती नव्हती. दोन दिवस गेले. सर्व माहितीच्या ठिकाणी चौकशा झाल्या. कोणालाच कांही पत्ता नव्हता. तिसरे दिवशी खुद्द बापूरावांच्याच हातचे पत्र आले. पुण्याहून आलं होतं. मायना वगैरे कांहीच नव्हता.

बिनकण्याची माणसं / ३४