पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "हो, दुसरा इलाजच नव्हता. आम्ही सर्वानी वर्गणी घालून पांच हजार रुपये गोळा केले आणि त्याला दिले. त्याने सर्वांसमक्ष आतां पुन्हां 'पूर्व-वैभव' च्या कोणालाही त्रास देणार नाही असे कबूल केलंय!"

 "हे सारं तुम्हांला खरं वाटतय्? तो पुन्हा दुकानाची शेड बांधणार नाही ह्याची खात्री वाटते?" बापूरावानी सर्वांकडे ठामपणे पहात विचारले. सर्वजण गप्प होते. काय उत्तर द्यायचे?

 "मला मारायला सीताराम आपल्या साथीदारांबरोबर आला तेव्हां तुम्ही पळालात कां ? मला मदत करावी, माझा जीव वाचविण्यासाठी धडपडावं असं नाही वाटलं कुणाला?" बापूरावानी सर्वांकडे पहात मोठ्याने विचारले.

 नेमक्या ह्याच प्रश्नाला ते तिघेजण मनोमन घाबरत होते.

 खरं म्हणजे नेमका हाच प्रश्न त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनाला भेडसावीत होता. बाहेर सर्वजण हेच विचारून त्यांना हैराण करीत. आणि आतां ज्यांच्यामुळे हा प्रश्न उद्भवला ते प्रत्यक्ष बापूरावच त्यांना आतां विचारत होते. कांही तरी बोलणं भागच होतं. साठे म्हणाले.

 "अचानक झालेल्या हल्ल्याने आम्हीं गडबडून गेलो. लोखंडी शिगा आणि काठ्या बघितल्यावर आम्ही पार घाबरलो. जीव वाचविणे, कांही करुन आपला जीव वाचविणं एवढंच आम्हाला सुचण्यासारखं होतं. तेवढंच आम्ही केलं. नंतर या गोष्टीचा आम्हांला खूप पश्चात्ताप झाला. तुमची माफी मागावी, तुमचे पाय धरावेत म्हणून खूपदां वाटलं. पण त्यानंतर तुम्हांला बरं नव्हतं. आणि तुम्ही आम्हांला टाळताय् असं वाटून आम्हाल तुमची मनोमन भीती वाटायला लागली."

 "पण त्यांचा हल्ल्याचा रोख फक्त माझ्यावरच होता. तुम्हाला त्यांनी खुशाल पळू दिले आणि तितक्याच आरामात मला टाकून तुम्ही पळालात देखील! मी एकट्याने काय त्या सीतारामचे घोडे मारले होते?"

 "हे दुकान उडविण्यामागे फक्त तुम्हीच आहात असं सीतारामला वाटतंय् !”

 "त्याला तसं वाटलं की तुम्हीच त्याला तसं वाटूं दिले? सीतारामचे दुकान ही काय माझी डोकेदुखी थोडीच होती? तुम्हाला तुमच्या मुली-बाळींसाठी त्रास वाटायला लागला म्हणून तुम्हीच माझ्याकडे आलात ना? मला थोडीच मुलंबाळं आहेत? मी माझ्या नेहमीच्या संवयीनुसार ह्या कामात पडलो तर निदान माझा पाठपुरावा तरी करायचा? खुशाल भेकडासारखे पळून गेलात. सीताराम कोणाच्या वाटेला जावू नये म्हणून त्याला पांच हजार दिलेत. त्यामुळे फार तर तो सध्या गप्प बसेल. उलट तुम्ही असे

निखळलेलं मोरपीस / ३३