पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्यात गप्पा मारायला आलात. बरं वाटलं." गोडबोले म्हणाले.

 "मी कांही शिळोप्याच्या गप्पा मारायला आलो नाही." बापूरावांच्या पहिल्याच फटक्यासरशी सर्वजण एकदम सावध झाले.

 "सीतारामकडे जाऊन आलात?"

 "अं; होऽऽ, पण तुम्हांला कसं कळलं?"

 "कुणाकडून कळलं त्याला महत्त्व नाही. तिथे काय घडलं ह्याला महत्त्व आहे. मला सगळं तुमच्याकडून ऐकायचं आहे. बोला साठे, काय काय झालं?"

 "तुम्हाला मारहाण झाल्यानंतरची गोष्ट. आम्ही तांतडीची मिटिंग घेतली."

  "कशासाठी?"

 "सीतारामबद्दल कांहीतरी ठरवायलाच हवं होतं. सीताराम हा साप आहे. त्याच्या शेपटीवर आपण पाय दिलाय. तो आतां आपल्याला दंश केल्याखेरीज राहणार नाही. त्याच्या पाठीशी गुंड आहेत. आपण नोकरदार माणसं. सकाळी ८ ॥ वाजतां बाहेर पडणार ते संध्याकाळी सात-साडेसातनंतर परत येणार. घरी बायका- मुले, कोणाकोणाकडे कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुली. म्हणून आम्हीच निर्णय घेतला आणि...“ येथे साठे थोडेसे थांबले. पुढची हकीक़त कशी सांगायची? पण बापूरावाना दम नव्हता. तेच म्हणाले.

 "हं, बोला, पुढे काय झाले?"

 'आम्ही सर्वजण मिळून सीतारामच्या झोपडपट्टीत गेलो.'

 'तुम्हाला घर माहीत होतं? आणि तुम्हाला भीती नाही वाटली?" बापूराव उपरोधिकपणे हंसून विचारताहेत असंच सर्वाना वाटलं.

 “आम्ही आपल्या झाडूवाल्या भूपतला बरोबर घेतलं होतं. त्याला घर माहीत होतं. आणि तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं तर जाताना भीती वाटत होतीच. पण असं कायमचं भीत राहण्यापेक्षां एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागेल ह्या विचाराचा आधार सोबतीला होता. आम्ही सीतारामशी बोलणी केली. तो म्हणाला माझं दुकान तुम्ही पाडलत. त्याची नुकसान भरपाई द्या."

 "आणि तुम्ही दिलीत? किती?"

 "त्याने पांच हजार रुपये मागितले."

 “काय? पांच हजार? आणि तुम्ही दिलेत ? बापूरावांचा चेहरा विचारतांनासुद्धा लालबुन्द झाला होता.

बिनकण्याची माणसं / ३२