पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेपटीवरच पाय दिलाय. तो आपल्यावर डूख धरल्याशिवाय राहायचा नाही. उद्यां बापूरावांचे झाले तसेच आपले.... छे, ती कल्पनासुद्धां कोणी सहन करूं शकत नव्हते. इतिहासकाळांत मोगल सैनिकांना जसे पाण्यातसुद्धां धनाजी संताजींचे प्रतिबिंब दिसे तसे त्या सर्वाना जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी, सीताराम आणि त्याचे गुंड साथीदार दिसायला लागले! प्रत्येकाच्या मनात असणाऱ्या या भीतीचे सोसायटीच्या मिटिंगमध्ये प्रकटीकरण झाले. खरं म्हणजे ह्याचसाठी खास मिटिंग बोलावली गेली. सीतारामबरोबर नमतं घेऊन वागावं. त्याच्याशी समझौता करावा ह्या निर्णयाला 'पूर्ववैभव' ची सर्व सभासद मंडळी आली. साठे, मोडक आणि गोडबोले ह्यांना सर्वाधिकार देऊन त्यांनी याबाबतीत योग्य ती कारवाई करावी आणि तीसुद्धा लौकरात लौकर करावी असे ठरले. त्यानंतर मात्र प्रत्येकाला थोडी निवांत झोप लागली.

∗∗∗


 त्यानंतर पंधरा एक दिवस लोटले. बापूरावाना हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं. जखमा अजून संपूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या. त्यांचं ड्रेसिंग करायला एक नर्स आता घरीच येत होती. बापूरावाना घरी आणलं तसं त्यांची पाहुणेमंडळी घरोघरी परतली. बापूराव जेमतेम घरातल्या घरात हिंडू फिरू शकत. सोसायटीतील मंडळी जात, तेव्हां ते कोणाशी फारसं बोलत नसत. बहुतांशी त्यांचे मौनच अधिक असे. त्यांना मधल्या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलाय. म्हणूनच ते बोलण्याचं टाळतायत अशीच सर्वांची कल्पना झाली. तरीपण नेहेमी बोलणारा माणूस एवढा गप्प गप्प असावा हे बरं वाटत नव्हतं. त्यातून बापूराव कांही चार सामान्य लोकांसारखे कच्च्या दिलाचे नव्हते. सीताराम आणि इतर गुंडांशी त्यानी एकटे असतानाहि प्रखर झुंज दिली होती. मग आपल्यावर बापूराव रागावलेले तर नसतील? साठे आणि मोडक ह्याना ह्याच कल्पनेचे मनोमन भय अधिक वाटे. बापूराव एकदा बोलायला लागले म्हणजे बरे!

 आणि एक दिवस अचानक बापूराव खरोखरच बोलूं लागले!

 रात्रीचे दहा वाजण्याचा सुमार होता. बापूरावानी साठेंच्या दाराची कॉलबेल वाजविली तेव्हां ते आश्चर्यचकीतच झाले. खरं म्हणजे मनातून थोडेसे गडबडलेसुद्धा. वरकरणी तोंडावर चांगले रुंद हास्य आणून त्यांनी बापूरावांचे स्वागत केले. त्याना कोचावर बसविले. मात्र तेवढ्या घाईघाईतसुद्धां त्यानी मुलाला पाठवून गोडबोले आणि मोडकला बोलावून घेतले.

 "वा बापूराव, आतां पुष्कळच तब्येत सुधारलेली दिसते. आपणहून तुम्ही

निखळलेलं मोरपीस / ३१