पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि भोंवळ येऊन पडले. ते खाली पडलेले बघतांच सीताराम व त्याचे साथीदार गल्लीतून पळाले.

 बापूरावांचा आरडाओरडा ऐकू येत होता, पण त्या तिघांच्या हातातील काठ्या व लोखंडी शिगा बघून रस्त्यावरचे पादचारी दूरवर पळाले होते. आधी त्या रस्त्याला फारशी रहदारी अशी नव्हतीच. एव्हाना शांताबाई हातात धुण्याची काठी घेऊन धांवत आल्या. बापूरावाना कोणीतरी मारतय् एवढेच रस्त्यावरुन त्याना कोणीतरी ओरडून सांगितले होते. तेवढे ऐकताच ताबडतोब त्या रस्त्याने धावत निघाल्या आणि बापूरावांना रक्ताच्या थारोळ्यात, धुळीत पडलेले पाहून मटकन् खालीच बसल्या. एव्हांना बरीच मंडळी गोळा झाली. त्यानी त्यांना सांवरले. बापूराव निश्चेष्ट दिसत होते. त्यांच्या कपाळावर मोठी खोक पडली होती. डोक्यावरुन, खांद्यावरुन, गालावरुन रक्त वाहात होते. इतक्या ठिकाणी रक्त वाहात होते की कोठे कोठे मार बसलाय् तेच कळत नव्हतं. सगळं अंग रक्ताने माखले होते, त्यांना ग्लानी आलेली होती.

∗∗∗


 डॉ. पुरोहितांच्या हॉस्पिटलमध्ये 'पूर्ववैभव' ची बरीच मंडळी गोळा झाली होती. बापूरावांची वृद्ध आई, बहिणी व इतर नातेवाईक आले होते. सर्वांना ती रात्र मोठी काळजीची गेली. सर्व मंडळी शांताबाईंच्या भोंवती बसली होती. त्यांना धीर देत होती. बऱ्याच वेळाने डॉक्टर बाहेर आले. सुदैवाने बापूरावांच्या जीवाला धोका नव्हता, पण बऱ्याच ठिकाणी टांके पडले होते. मुका मारपण बसला होता. सगळे शरीर कपड्यांऐवजी बँडेज्मध्येच गुंडाळल्यासारखे दिसत होते. बरेच दिवस अंथरुणावरच पडून राहावे लागणार होते.

 साठे, मोडक नि गोडबोले ह्या त्रिकुटाला लोकांनी टोचून टोचून अगदी हैराण केले होते. बापूरावाना मारहाण होतेय्, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय्, अशा वेळी त्यांना मदत करायची सोडून, आपण त्याना एकाकी टाकून पळून गेलो ह्यामुळे त्यांचे अपराधी मन त्यांना खात होतेच. पण इतरांच्या निर्भत्सनेमुळे त्यावर मीठ चोळले जाई. सुरवाती सुरवातीला त्याना वाईट वाटले. पण नंतर त्यांना पटले की आपण केलं तेच बरोबर होतं. उगाच सुखासुखी आपला जीव काय म्हणून धोक्यात घालायचा? आणि आपल्याचा थोडीच मारामारी जमली असती? आणि सीतारामसारख्या गुंडांशी आपण किती काळपर्यंत टक्कर देत बसणार? उद्या सीतारामने आमच्यापैकी एकेकट्याला गांठायचं ठरवलं तर? आणि नेमकी हीच भीती प्रत्येकाला मनोमन भेडसावत होती. सीताराम म्हणजे साप आहे साप. त्याचे दुकान जमीनदोस्त करुन आपण त्याच्या

बिनकण्याची माणसं / ३०