पान:निखळलेलं मोरपीस.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेऊन नोकरवर्ग परतला. तो दिवस सर्वानाच खूप आनंदाचा आणि उत्साहाचा वाटला. बापूरावानी मनावर घेतलं म्हणूनच हे सोसायटीवरचं गंडांतर टळलं. बरेचजणांनी तसं बोलून दाखविले. त्या दिवशी सर्वांच्या गप्पा अगदी रात्री उशीरापर्यंत चालल्या होत्या. सर्वजण खुशीत होते, कां कोणास ठाऊक पण शांताबाई मात्र गंभीर होत्या.

∗∗∗


 दोन दिवसानंतरच्या एका संध्याकाळी बापूराव लोकलमधून उतरले. बरोबर साठे, गोडबोले व मोडक हे नेहमीप्रमाणे होतेच. बाजारांतून भाजी वगैरे घेऊन गप्पा मारत मारत ते 'पूर्ववैभव'च्या कोपऱ्यावर आले असतील नसतील, एवढ्यात अचानक सीताराम त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात फुललेला अंगार तेवढ्या संधीप्रकाशातही सर्वाना दिसला. त्याच्या हातात एक काठी होती. त्याच्याबरोबर आणखी दोघेजण होते. त्यांच्या हातातहि काठ्या होत्या. खेरीज एकाच्या हातात लोखंडी शीग होती. त्यांच्या एकूण अवतारावरून दोघे चांगले अट्टल गुंड दिसत होते. सीतारामने बापूरावांच्या दिशेने बोट दाखवितांच ते दोघेजण काठ्या उगारून बापूरावांच्या बाजूला आले. त्या तिघांचा एकूण रुद्रावतार व त्यांच्या हातातील काठ्या बघून मोडक, साठे आणि गोडबोलेंच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले! दुकान पाडताना बरे वाटले, पण सीताराम एवढा डूख धरील असे वाटले नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर बायका-मुले दिसू लागली. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपला जीव बचावला पाहिजे एवढेच आकलन त्यावेळी त्यांच्या मेंदूला होत असावे कारण जेव्हा सीताराम 'थांबा भडव्यानो, आतां एकेकाची गठडी वळतो' असे म्हणत धांवून आला तेव्हां त्या तिघांनीहि आपापल्या ऑफिस बॅगस्, भाजीच्या पिशव्या तेथेच टाकून मागच्या मागेच पळायला सुरवात केली. इतर दोघेजण बापूरावांवर तुटून पडलेले त्यांना दिसत होते पण सीताराम काठी उगारून आपल्यामागे धांवत येतोय् हे बघितल्यावर त्यांनी आणखीनच जोरात पळायला सुरवात केली. सीताराम क्रूरपणे हंसला. 'हत् भटांनो, पळपुटे कुठले' असे म्हणाला आणि त्याने आपला मोर्चा बापूरावांकडे वळविला. बापूराव त्या दोघा गुंडांशी प्राणपणाने झुंजत होते. दोघांच्या काठीचे वार आपल्या हातांतील ब्रीफकेसवर ढालीसारखे झेलत होते. एकदा तर मोका साधून त्यांनी ब्रीफकेस एकाच्या डोक्यात हाणली, तेव्हां दुसरा साथीदार बापूरावांच्यावर तुटून पडला. एवढ्यात सीतारामने त्यांच्या डोक्यावर, छातीवर काठीचे सपासप वार केले. मघा डोक्यावर मार बसलेला गुंड आता चेवाने पुढे आला. त्याने बापूरावांचा शर्ट कॉलरपाशी धरला, दुसऱ्याने त्यांचे तोंड धरले व फडाफड् डोळ्यांवर, कानावर व नाकावर जोरदार मुष्टिप्रहार केले. एकटे, नि:शस्त्र बापूराव किती वेळ तग धरणार? सीतारामने डोक्यावर मारलेल्या काठ्यांच्या सपासप वाराने ते खाली कोसळले

निखळलेलं मोरपीस / २९