पान:निखळलेलं मोरपीस.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रात्री मिटींग झाली. सोसायटीतर्फे म्युनिसिपालिटीकडे रीतसर अर्ज पाठवायचे ठरले. सीताराम सोसायटीच्या हक्कावर आक्रमण करतोय्. सोसायटीच्या मालकीच्या भू-पट्ट्यावर बांधकाम करतोय्. तेव्हा हे बांधकाम बेकायदेशीर असल्याने म्युनिसिपालिटीने ताबडतोब कारवाई करुन हे दुकान जमीनदोस्त करावे अशा अर्थाचा ठराव सर्वानुमते संमत झाला. सारा अर्ज बाबुरावानी एकहाती लिहिला आणि दुसरे दिवशी स्वत: नेऊन म्युनिसिपालिटीत दाखल केला. अर्थात् सध्याचे पदाधिकारी म्हणून साठे -मोडकाना त्यावर सही करावी लागली.

∗∗∗


 पंधरा एक दिवस लोटले. नगरपालिकेकडून कोणतीच हालचाल नव्हती. तोंडावर आलेल्या निवडणुकांकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. तेव्हां 'पूर्ववैभव' च्या असल्या किरकोळ गाहण्याची कोण दखल घेणार? इकडे सीतारामच्या कटकटीपण वाढल्या होत्या. सीताराम आणि त्याची साथीदार मंडळी आजूबाजूच्या लोकांची टिंगल-टवाळी करीतच, खेरीज सोसायटीच्या मुलींची पण छेडछाड काढत. बापूरावानी सीतारामाला चुचकारण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. पालथ्या घड्यावर पाणी. उलट आपल्याविरूद्ध सोसायटीच्या लोकांनी नगरपालिकेत तक्रार अर्ज केल्याचे कळले, तेव्हांपासून तर तो अधिकच उन्मत्त झाला. "कसे माझे दुकान पाडताय् बघू दे तरी! एकेकाची नाही तंगडी तोडली तर नावाचा सीताराम नाही, असे मिशीला पीळ देऊन बोलू लागला. आतां मात्र गप्प राहणं बापूरावांना शक्य नव्हतं. त्यानी एखाद्या कामाला हात घातला आणि ते तडीला नेले नाही असे कधी व्हायचंच नाही. सोसायटीची इतर सभासद मंडळी आपणहून कांही करायची नाहीतच आणि वर 'बापूराव आतां सीताराम कायमचाच राहणार काय?' असे विचारीत. बापूराव आतां इरेला पडले. एक दिवस त्यांनी रजा घेतली व तडक जाऊन थेट कलेक्टर ऑफिस गांठलं. हर प्रयत्नांनी त्यानी कलेक्टरची भेट घतली. जुनी ओळख काढली. आजची सामाजिक परिस्थिती, वाढती गुंडगिरी, राज्यकर्त्या वर्गाची अनास्था असे बरेच कांहीसे बापूराव त्यांच्याशी बोलत राहिले. अखेर कलेक्टरसाहेबांनी जातीने ह्या कामात लक्ष घालण्याचे कबूल केले.

∗∗∗


 कलेक्टरसाहेबांनी आपले अभिवचन खरोखरच पाळले. त्यांचा हुकूम गेल्यावर चार पांच दिवसातच म्युनिसिपालिटीचे लोक आले. आणि बघतां बघतां त्यानी सीतारामचे दुकान जमीनदोस्त केले. सगळी जागा साफसूफ केली. सोसायटीकडून मोठी बक्षिसी

बिनकण्याची माणसं / २८